भारत हा कृषिप्रधान देश असला तरी देशात जनावरांच्या आजारावर उपचार करण्यासाठी अत्यंत मोजक्या स्वरूपात डॉक्टरांची संख्या आहे. संपूर्ण भारतात फक्त एकुणपन्नास (४९ ) पशुवैद्यकीय कॉलेजेस आहेत तर खाजगी स्वरूपात सुमारे सात ते आठ कॉलेजेस पूर्ण देशात आहेत त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात दरवर्षी पशुवैद्यकीय डॉक्टर बाहेर पडतात. पशुवैद्यकीय डॉक्टरांची दरवर्षी फक्त पाच हजारांची बॅच पास होते. कृषिप्रधान देशात हे प्रमाण अत्यंत कमी असून सरकारी पातळीवर नवीन पशुवैद्यकीय कॉलेजेस सुरू होण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत.
जिल्ह्यात सध्या लंम्पि आजाराने धुमाकूळ घातलेला असून डॉक्टरांची प्रचंड कमतरता जाणवत आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये शिकत असलेले काही विद्यार्थी नगर जिल्ह्यात दाखल झाले असून लंम्पि आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.जिल्ह्यातील 290 पैकी 184 जनावरे बरी झालेली असून जनावरांचे लसीकरण वेगाने करण्यात यावे यासाठी या विद्यार्थ्यांना नगर येथे बोलावण्यात आलेले आहे.
पशुवैद्यकीय कॉलेज काढण्यासाठी असलेली प्रक्रिया ही अत्यंत किचकट असल्याने इंजिनीअरिंग, मेडिकल आणि फार्मसी कॉलेजच्या तुलनेत या कॉलेजची संख्या ही नगण्य आहे. संपूर्ण महाराष्ट्र इथे फक्त नागपूर, मुंबई, शिरवळ, उदगीर आणि परभणी या पाच ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट डिग्री शिक्षण (बीव्हीएससी ) उपलब्ध आहे. पशुवैद्यकीय खाजगी कॉलेजेस राजस्थान हरियाणा आणि पंजाब येथे असून तेथील फी सुमारे सात लाख प्रति वर्ष असल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण घेणे अशक्य आहे. लंम्पिसारख्या जनावरांच्या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी अत्यंत कमी असे मनुष्यबळ उपलब्ध असल्याने येत्या काळात पशुवैद्यकीय कॉलेजेसची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे राहणार आहे.