जनावरांचं विलगीकरण कसं करायचं ? , गोठ्यात लंम्पि अन बाहेर बिबट्या अन पाऊस

शेअर करा

कोरोना संकटात सर्व नागरिकांचे जगणे मुश्कील झाले होते त्यापाठोपाठ आता देशात जनावरांच्या लंम्पि आजाराचे संकट आलेले असून गाय आणि म्हैस यांच्यामध्ये प्रामुख्याने लंम्पि आजार पाहायला मिळत आहे. आजाराची लागण झालेल्या जनावरांना आता ‘ क्वारंटाईन ‘ करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली असून अनेक शेतकऱ्यांकडे ही जनावरे विलगीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोठे उपलब्ध नाहीत तर बिबट्या आणि पाऊस यांच्या भीतीने जनावरांना उघड्यावर सोडण्याची देखील भीती शेतकर्‍यांमध्ये आहे.

नगर जिल्ह्यात सध्या जनावरांचा बाजार भरवणे , जनावरांची वाहतूक करणे, शर्यती याच्यावर बंदी घालण्यात आलेली असून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित असलेल्या जनावरांची वाहतूक होऊ नये आणि या रोगाचा प्रादुर्भाव इतरत्र पसरू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

गुरे आणि म्हशी यांची नियंत्रित क्षेत्रात किंवा त्या क्षेत्राबाहेर अन्य ठिकाणी वाहतूक करण्यास मनाई करण्यात आलेली असून कोणत्याही बाधित असलेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली वैरण , प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत तसेच मयत जनावरांची कातडी किंवा इतर कुठलेही भाग तसेच बाधित असलेले प्राणी यांना नियंत्रण क्षेत्राच्या बाहेर नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. लंम्पि आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .


शेअर करा