ठेकेदाराला कमिशन अन आईवडिलांना पैसे, राज्यात ‘ बालमेंढपाळ ‘ रॅकेट सक्रिय

मेंढपाळ म्हणून काम करण्यास अवघ्या पाच ते सहा वर्षाच्या मुलांना जुंपण्याचा प्रकार महाराष्ट्रात समोर येत असून जळगाव नाशिक आणि आता बुलढाण्यात देखील असाच प्रकार समोर आलेला आहे. मध्य प्रदेशातून पाच ते सहा वर्षीय चिमुकल्या मुलांना आई-वडिलांसोबत एक करार करून अवघ्या काही रुपयांसाठी कामाला जुंपत महाराष्ट्रात आणण्यात येते आणि त्यानंतर त्यांचा छळ सुरू केला जातो. बुलढाणा येथील चाईल्ड लाईन संस्थेने पाच मुलांची सुटका केलेली असून मेंढपाळ आणि ठेकेदार यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पूर्वीच्या काळी मेंढपाळ म्हणून तरुण वर्ग काम करायचा मात्र काळानुरूप त्यांना जास्त रोजगार देणारी इतर साधने उपलब्ध झाल्याने मेंढपाळ म्हणून काम करण्यास सहसा कोणी तयार होत नाही याचाच फायदा घेत मध्यप्रदेशातील गोरगरीब कुटूंबांना हेरून त्यांच्या अल्पवयीन मुलांना घेऊन महाराष्ट्रात आणून मेंढपाळ म्हणून कामाला जुंपले जाते. नाशिक येथे अशाच एका प्रकरणात एका मुलीचा मृत्यू झाला होता हे प्रकरण चर्चेत असतानाच दुसरे हे प्रकरण समोर आले आहे.

मध्यप्रदेशातील पाच ते सहा वर्षांच्या पाच मुलांना एका ठेकेदाराने मेंढ्या चारण्यासाठी म्हणून बुलढाणा जिल्ह्यात आणले होते. अत्यंत दुर्गम अशा भागात ही अल्पवयीन मुले मेंढ्या चारताना दिसून आल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी हे धक्कादायक सत्य समोर आले. नऊ सप्टेंबरला चिखली रोडने भगीरथ कारखान्याजवळ ही बालके आढळून आली होती.

काही जागरूक नागरिकांनी हेल्पलाइनला फोन करून या प्रकरणी माहिती दिली त्यावेळी समन्वयक शेख साहेब यांनी शहर पोलिसांना कळवले. पोलीस पथक सक्रिय झाले आणि त्यानंतर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या मुलांची मेंढपाळांच्या रॅकेटमधून सुटका केली. 12 सप्टेंबर रोजी सदर प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या मुलांच्या आई-वडिलांवर देखील कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलांना कामाला जुंपणे हा गुन्हा असून काही किरकोळ रकमेसाठी या मुलांचे पालक देखील त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून राज्यात इतरत्र पाठवून देतात. अत्यंत दुर्गम भागात गुरे चारण्याची कामे ही मुले करत असून परिसरातील हिंस्र प्राणी बिबट्या, लांडगे यांच्यापासून देखील या मुलांच्या जीवितालाही धोका आहे. ठेकेदाराला कमिशन मिळते आणि आई-वडिलांना पैसे त्यामुळे या मुलांची व्यथा जाणून कोण घेणार ? हा देखील प्रश्न आहे .