.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा

शेअर करा

श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्यापही शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नसून दीपक याची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर श्रीरामपूर तालुक्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी ‘ आमचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आमच्या या विश्वासाचा अंत पाहू नका. दीपक बर्डे या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ शिक्षा द्या ‘ अशी मागणी केली आहे.

शिवाजी ढवळे म्हणाले की, ‘ भोकर येथील दीपक बर्डे हा 31 ऑगस्ट पासून बेपत्ता झालेला आहे. गावातील काही आरोपींनी त्यांची हत्या करून त्याचा मृतदेह कमालपुर येथील गोदावरी नदी पात्रात फेकून दिला मात्र मृतदेह अद्यापही सापडलेला नाही. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जात आहे मात्र याचा अर्थ तपासात दिरंगाई खपवून घेऊ असा नाही. तातडीने दीपक याच्या मृतदेहाचा शोध लावा. अटक केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ‘ अशी मागणी त्यांनी केली आहे.

सदर गुन्ह्यांमध्ये आरोपींना कोणी मदत केली असेल तर त्यांना देखील सहआरोपी करावे अशा स्वरूपाचे निवेदन त्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना दिले आहे . सदर दीपक बर्डे याचा मृतदेह शोधण्यासाठी सुमारे 50 पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मात्र आरोपींनी कबुली दिल्यानंतर पाच दिवस झाले तरी देखील हा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.


शेअर करा