नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेसकडून ‘ राष्ट्रीय बेरोजगार दिन ‘ म्हणून श्रीगोंद्यात साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा गोदी मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सवच साजरा केला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकीकडे देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक द्वेष मोठ्या प्रमाणात पसरवला जात असून काँग्रेसने रस्त्यावर उतरून आता केंद्र सरकारला प्रश्न विचारणे सुरु केले आहे. श्रीगोंदा येथे वाढती बेरोजगारी याच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेस आणि श्रीगोंदा तालुका काँग्रेस यांच्यावतीने शनी मंदिरात नारळ, तेल आणि फुल अगरबत्ती विकून गांधीगिरी करण्यात आली. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा देखील करण्यात आला.

युवक काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात आले असून त्यामध्ये ,’ वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते मात्र त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. सरकारी संपत्ती असलेल्या कंपन्यांचे खाजगीकरण करून सरकारी नोकरी आणि त्यामधील आरक्षण संपवण्याचा अजेंडा मोदी हे राबवत आहेत. रोजगार नसल्याने तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण देखील वाढलेले आहे आहे ‘ असेदेखील सांगण्यात आले आहे.

काँग्रेसच्या वतीने केलेल्या या आंदोलनात माजी नगरसेवक सतीश मखरे, संतोष काळाने, राहुल साळवे, धीरज खेतमाळीस, सागर बेलेकर यांच्यासह मोठ्याप्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.