पुणे हादरलं..लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या

पुणे शहरात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या हातातील कटरने गळा चिरून घेतला आणि आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

उपलब्ध माहितीनुसार., महेश राजाराम तवंडे ( वय 32 रायकर मळा धायरी पुणे मूळ राहणार कोल्हापूर ) असे या तरुणाचे नाव असून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीला आलेली आहे. घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून प्राथमिक माहितीनुसार नैराश्यात गेल्यानंतर त्याने हे कृत्य केले असावे असे सांगण्यात येत आहे.

महेश हा मूळचा कोल्हापूर येथील असून एका ठिकाणी तो ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. दरम्यानच्या काळात एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली होती. गणपती उत्सवापासून त्याची मैत्रीण ही बाहेर गावी गेली होती त्यामुळे तो एकटाच रूममध्ये होता शुक्रवारी त्याने फ्लॅट बंद करून स्वतःच्या हाताने शरीरावर आणि गळ्यावर वार केले.

घर मालकाला याठिकाणी ओरडण्याचा आवाज आला देखील होता मात्र या दोघांमध्ये याआधी देखील भांडणे होत होती म्हणून त्यांनी सदर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. बराच वेळ उलटून देखील दरवाजा उघडण्यात आला नाही म्हणून त्यांनी सिंहगड पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी महेश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिलेला असून घटने मागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही .