विद्यार्थीनींची छेड काढली म्हणून प्राध्यापकास मारहाण , शेवगावमधील घटना

नगर जिल्ह्यात शेवगाव येथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून संतप्त विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी आणि शहरातील काही तरुणांनी शेवगाव येथे संबंधित कॉलेजमध्ये दाखल होत प्राध्यापकाची जोरदार धुलाई केलेली आहे. पोलिसांनी संशयित प्राध्यापक आणि या तरुणांना पोलिस ठाण्यात आणले होते मात्र त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून प्राध्यापकाने या अगोदर देखील अनेक विद्यार्थिनीची छेड काढली आहे असाही आरोप या प्राध्यापकांवर करण्यात येत आहे. आपली बदनामी होईल या भीतीने अनेक विद्यार्थीनींनी तक्रारही दिलेली नाही. किरकोळ कारण असल्याचे सांगत महाविद्यालयाने देखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असे देखील नातेवाईकांचे म्हणणे आहे. एका तरुणीने छेड काढण्याचा प्रकार घरी सांगितला आणि त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी महाविद्यालयात येऊन या प्राध्यापकाला जाब विचारला.

नातेवाइकांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्राध्यापकांची चांगलीच भंबेरी उडाली आणि त्यानंतर त्याने मुलीच्या तरुणीच्या नातेवाईकांना देखील दमदाटी सुरू केली त्यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईक आणि गावातील काही तरुणांनी या प्राध्यापकाची जोरदार धुलाई केली मात्र त्यानंतर कोणीही फिर्याद दिली नाही म्हणून संबंधित प्राध्यापक आणि तरुणीचे नातेवाईक यांना तोंडी समज देऊन त्यांची सुटका करण्यात आली .