नगर शहर आणि जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीचे वातावरण असून दररोज पडणारा पाऊस आता नकोसा वाटायला लागलेला आहे. शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागलेली असून रस्त्यावरील पॅचिंग वाहून गेल्यामुळे पुन्हा रस्ते जैसे थे झालेले आहेत. नेहमीप्रमाणे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले असून ठेकेदाराना नव्याने बिल अदा करण्यात येणार आहेत.
नगर शहरातील अंतर्गत रस्ते सुरुवातीला खराब झाले आणि त्यानंतर सततच्या पावसाने मुख्य रस्ते देखील वाहून गेलेले आहेत. काल देखील शहरात दिवसभर विक्रमी पाऊस पडला आणि पावसाने रस्ते वाहून गेले. महापालिकेच्यावतीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचिंग करण्यात आले होते मात्र सतत आठ दिवसाच्या पावसाने मनपाच्या कामाची पोलखोल केलेली आहे. अत्यंत निकृष्ट पद्धतीचे रस्ते पावसात वाहून गेले आणि नगरकरांना पुन्हा सहा सात महिन्यापूर्वी रस्त्यांची परिस्थिती जशी होती तशीच नशिबी आलेली आहे. काम करणाऱ्या ठेकेदारांना इतके निकृष्ट काम केल्यावरही बिले अदा करण्यात येतात आणि एकाच रस्त्याचे काम अनेकदा करूनही कधीही व्यवस्थित का होत नाही ? याबद्दल नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त केला जात आहे.