शिंदे फडणवीस मोदी शहांचे हस्तक त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाईल असे म्हटले होते त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रहार केलेला असून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोदी शहा यांचे हस्तक आहेत त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही, असे म्हटले आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाण्याच्या वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 पर्यंत किती संस्था आणि किती प्रकल्प गुजरातला गेलेले आहेत याची यादी द्यावी. राज्याचे पाणीदेखील फडणवीस यांनी गुजरातला दिलेले आहे. फडणवीस यांचे स्वतःचेच महत्त्व कमी झाले असून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले याचे आम्हालाही दुःख आहे .

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सध्या ओबीसी संघटन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून बांठिया आयोगाने आडनावावरून राज्यात 38 टक्के ओबीसी असल्याचे सांगितले मात्र ही माहिती चुकीची आहे. राज्यात सुमारे 60 टक्के ओबीसी जनता असून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नरेंद्र मोदी हे ओबीसी नसून भाजप केवळ त्यांचे चुकीचे मार्केटिंग करत आहे. केंद्राने ओबीसी जनगणना केली पाहिजे अन त्याचा फुटबॉल करू नये.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात जातिनिहाय जनगणना झालेली होती त्याचा अहवाल केंद्र सरकारने जारी करावा. भारत जोडो यात्रा ही केवळ राजकीय यात्रा नसून देशाला एकत्रित बांधण्याची यात्रा असून देशात तिरंगा नेहमी फडकत राहिला पाहिजे अशी त्यामागची भूमिका आहे त्यामुळे या यात्रेत सहभागी होण्यासाठी आमच्या सहकारी पक्षांना निमंत्रणाची देखील गरज नाही असेही आवाहन त्यांनी पुढे केले.