नगर ब्रेकिंग..गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणाला ‘ वेगळंच ‘ वळण

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन जणांनी प्राण गमावलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्तधनाचा लाभ व्हावा यासाठी नरबळी देण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवला गेलेला होता असे स्पष्ट झालेले आहे.

बुधवारी शहर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे भाऊ राजू कचरू नन्नवरे यांनी या संदर्भात फिर्याद दिलेली असून आरोपी नवरा शशिकांत अशोक शेलार, अशोक ठकाजी शेलार, लिलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाळासाहेब शेलार, पवन बाळासाहेब शेलार ( सर्वजण राहणार बेलापूर ), काजल किशोर खरात, किशोर सुखदेव खरात आणि अनिकेत पाटोळे ( राहणार कोल्हार ) सोबतच गागरे बाबा , देवकर गुरु, सांगळे बाबा यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सोबतच खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपींनी संगनमत करून गुप्तधनाच्या लालसेपोटी गॅस गळतीचा स्फोट घडून आणला. हा अपघाती मृत्यू नसून सर्व प्रकार गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशाने केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी ही घटना घडवून आणली आणि पुराव्याची देखील विल्हेवाट लावली असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणी पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे समजते.

सहा जानेवारी 2021 रोजी ही घटना घडली होती त्यामध्ये ज्‍योती शशिकांत शेलार व त्यांची नऊ वर्षांची मुलगी नमोश्री शशिकांत शेलार या दोघींचा मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी घडल्यापासूनच ही घटना म्हणजे अपघात असल्याचा संशय परिसरात व्यक्त केला जात होता. भोंदू बाबाच्या सांगण्यावरून हा कट घडवण्यात आला त्यामध्ये पत्नी ज्योती आणि नमोश्री यांचा गुप्तधनाच्या शोधासाठी बळी देण्याचा हेतू होता असे देखील फिर्यादीत म्हटले आहे. जखमी झालेली पत्नी आणि मुलगी यांच्या उपचारासाठी मदत म्हणून नागरिकांनी काही रक्कम दिली ती देखील आरोपींनी ठेवून घेतली असेही फिर्यादी यांचे म्हणणे आहे.