काय बिघडवणार ऐप आमचं ? कर्ज घेणाऱ्यांनी केल्या आहेत आत्महत्या : नक्की वाचा

कोरोना संकटानंतर अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडलेले होते त्याचा फायदा घेत भारतात अवैध कर्ज देणाऱ्या अनेक ॲप्सचा सुळसुळाट झालेला असून केवळ मोबाईलच्या माध्यमातून कर्ज म्हटल्यानंतर अनेक नागरिक देखील त्यांच्या जाळ्यात अडकतात. अवघ्या काही हजारांचे कर्ज घेतल्यानंतर तब्बल साडेतीनशे टक्क्यांपर्यंत व्याज लावून अघोरी वसुली करण्यात येण्याचे प्रकार समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकरणात चिनी कंपन्यांची गुंतवणूक असून भारतातील नागरिकांचे जगणे मुश्कील केलेले आहे.

केंद्र सरकार अवैध कर्ज देणाऱ्या ऐपची एक लिस्ट तयार करत असून ही लिस्ट गुगल प्ले स्टोअर यांना दिली जाणार आहे त्यानंतर काही ॲप हे गुगल प्ले स्टोअर वरून हटवण्यात येतील अशीही माहिती समोर आली आहे. मागील काही वर्षात गुगलने काही ऍप हटवले देखील आहेत मात्र आता या कंपन्यांनी जाहिरात करण्यासाठी व्हाट्सअपची निवड केलेली आहे. आपले ऐप गुगल प्लेस्टोअर मध्ये लिस्ट होणार नाही हे लक्षात आल्यानंतर व्हाट्सअप आणि इतर माध्यमातून फसवेगिरी करत नागरिकांच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करण्यासाठी फसवे मेसेज टाकून दिशाभूल करण्यात येत आहे. ऐप टाकल्यानंतर कर्ज घेण्याच्या बहाण्याने अनेक नागरिक यांच्या जाळ्यात सापडतात आणि त्यानंतर अक्षरश: त्यांचे फोटो सोशल मीडियावर मॉर्फ करून व्हायरल करण्यापर्यंत या गुन्हेगारांची मजल गेलेली आहे.

बहुतांश नागरिकांना आपल्या मोबाईलमधील वेगवेगळ्या फिचर्सची माहिती नसते याचा फायदा घेत ज्यावेळी हे ॲप इन्स्टॉल केले जाते त्यावेळी आपल्या संपर्कातील व्यक्तीची नावे , त्यांचे मोबाईल नंबर तसेच आपले काही फोटो, व्हिडिओ याचा आधार घेत हा डाटा या कंपन्यांकडून जमा करून घेण्यात येतो . आपली फोटो गॅलरी, कॉन्टॅक्ट लिस्ट, चॅटिंग , मोबाईल कॅमेरा या सगळ्याचा ॲक्सेस या कंपन्याला आल्यानंतर ही सर्व माहिती चीन आणि हॉंगकॉंग येथील सर्वरमध्ये पाठवली जाते

किरकोळ स्वरूपाचे काही हजाराचे कर्ज दिले तर त्यासाठी वसुली करणाऱ्या अनेक एजंटांना ही माहिती शेअर केली जाते आणि त्यातून त्यांना भरभक्कम असा बोनस देखील दिला जातो अशाच पद्धतीने गुरुग्राम, नवी दिल्ली , मुंबई, बंगलोर या ठिकाणी या गुन्हेगारांनी स्वतःच्या कंपन्या उभारलेल्या असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे. ॲपच्या माध्यमातून कर्ज ही ऐकण्यास सोपी प्रक्रिया वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक नागरिकांनी यांच्या वसुलीला वैतागून आत्महत्या देखील केलेले आहेत.