महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या एका वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले असून कोलकत्ता येथून अवघ्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला नागपूर ब्रह्मपुरी या ठिकाणी देहविक्री करण्यास भाग पाडण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेने या अल्पवयीन मुलीला हा प्रकार करण्यास भाग पाडणाऱ्या एका पती-पत्नीला बेड्या ठोकलेल्या आहेत .
उपलब्ध माहितीनुसार, मंजीत रामकृष्ण लोणारे ( वय 40 ) आणि त्याची बायको चंदा मंजीत लोणारे ( वय 32 ) अशी आरोपी पती पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात पॉक्सो पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अपहरण केलेल्या या मुलीकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतला जात होता. ब्रह्मपुरी येथील माळ डोंगरी रस्त्यावर विदर्भ इस्टेट येथे राहत असलेल्या या पती-पत्नीच्या कुटुंब घरावर धाड टाकली त्यावेळी तिथून या मुलीला ताब्यात घेण्यात आले.
पीडित अल्पवयीन मुलीचे वय हे अवघे 14 वर्ष असून तिला कोलकत्तावरून नागपूरला आणण्यात आले होते . तेथून त्यानंतर तिला चंद्रपूर येथे आणण्यात आले त्यानंतर चंद्रपूरवरून पुन्हा या मुलीला नागपूरला नेऊन वेश्याव्यवसायात जुंपण्यात आले. सदर आरोपी दाम्पत्याने पुन्हा एकदा तिला ब्रह्मपुरी येथे आणले होते गुप्त सूत्रांच्या माध्यमातून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यांनी या दांपत्याच्या तावडीतून त्याची सुटका केली.
सदर प्रकरणात ब्रम्हपुरी पोलिसांनी मुख्य आरोपींची पोलिस कोठडी घेऊन माहिती घेतली सदर माहितीचे आधारावर वडसा येथील अरविंद इंदूरकर, शिवराम हाके, राजकुमार उंदिरवाडे , मुकेश बुराडे, प्रकाश परशुरामकर, सौरभ बोरकर, गौरव हरिणखेडे या लोकांना देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात अटक केली आहे.