गूढ उलगडले , अखेर ‘ त्या ‘ बुरखाधारी महिलेचा खुनी झाला जेरबंद

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी जिल्ह्यात पूर्णा येथे उघडकीला आली होती. पूर्णा शहरातील तडीपार मैदानावर एका मुस्लिम महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या महिलेची ओळख पटवली आणि त्यानंतर आरोपीला जेरबंद केले आहे. हैदराबाद येथे दाखल होत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अरबाज खान पठाण असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, अवघ्या एक महिन्यापूर्वी या महिलेचा निकाह अरबाज खान पठाण याच्यासोबत झालेला होता त्यानंतर अवघ्या एक महिन्यात 20 सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तडीपार मैदानावर आढळून आलेला होता. तिचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केलेला असावा असा अंदाज वर्तवत पोलिसांनी सर्वप्रथम महिलेची ओळख पटवली त्यावेळी तिच्या वेशभूषेनुसार ती मुस्लिम असल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तिच्यासोबत एक व्यक्ती आढळून आलेला होता.

पुर्णा रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला एका तरुणासोबत जात असताना दिसून येत होती. पोलिसांनी त्यानंतर आरोपीचा चेहरा तपासत त्याचीही ओळख पटवली मात्र तो हैदराबाद येथे फरार झालेला होता. पोलिसांनी त्यानंतर हैदराबाद येथे दाखल होत स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. आरोपी आणि मयत महिला यांचा एक महिन्यापूर्वी विवाह झालेला होता त्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला म्हणून आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचे समोर आले आहे.


शेअर करा