‘ .. तरीही मुस्लिम समाज भाजपवर विश्वास ठेवणार नाही कारण वेळ निघून गेली ‘

शेअर करा

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी एका मशिदीचे इमाम यांची भेट घेतली होती त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला असून खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून जातीधर्मात द्वेषाचे राजकारण करणाऱ्या पक्षसंघटनाचे धाबे दणाणले आहेत असे म्हटले आहे.

काय म्हणाले नाना पटोले ?

हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून आपले राजकीय हेतू साधणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या पायाखालील वाळू भारत जोडो यात्रेमुळे सरकली आहे म्हणूनच संघाला मुस्लिम समाजाची आठवण झालेली आहे म्हणून त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम उमर यांची भेट घेतली.

कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरू झाली असून या पदयात्रेला आता पंधरा दिवस झाले आहेत. सर्व समाजाचा या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे . देशाची एकता आणि विविधता अबाधित ठेवणे लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी गरजेचे आहे. भारत जोडो यात्रेत सहा वर्षाच्या मुस्लिम मुलीने राहुल गांधी यांची भेट घेतली म्हणून टीका करून भाजपने आपला मुस्लिमद्वेष व्यक्त केलेला आहे. मुस्लिम समाजाची टोपी ज्या लोकांना आवडत नाही त्यांना आज मशिदीत जाऊन इमामाची भेट घ्यावी लागते हेच कॉंग्रेसच्या यात्रेचे फलित आहे मात्र मुस्लिम समाज आता भाजपवर विश्वास ठेवणार नाही कारण ती वेळ निघून गेलेली आहे ‘ असेही नाना पटोले पुढे म्हणाले.


शेअर करा