नगरकरांनो आमची ‘ क्रिएटीव्हीटी ‘ तुम्हाला सहन करावीच लागेल अन्यथा कानात बोळे घाला

नगर शहर आणि उपनगर परिसरात सध्या सायलेन्सरच फटाका आवाज असलेल्या अनेक दुचाक्या काही हौशी व्यक्तींकडून चालविण्यात येत असून डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करत नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्री-अपरात्री देखील जोरजोरात सायलेन्सरचे फटाके फोडत या बाईक परिसरातून जात असल्याने नागरिकांची देखील चांगली झोपमोड होत आहे . त्यांना हटकले तर दमदाटीची भाषा या ‘ दादा काका नाना तात्या भाई भाऊ नेते भैय्या ‘ यांच्या चेल्यांकडून केली जात आहे .

शाळा, महाविद्यालय, दवाखाने तसेच इतर वर्दळीच्या रस्त्यावर देखील हे दुचाकीस्वार आपल्या गाडीचा आवाज नागरिकांना जबरदस्तीने ऐकवत त्रास देत असतात. तारकपूरपासून तर गंगा उद्यान, यश पॅलेस चौकापासून तर मार्केट यार्ड, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड तसेच शहरातील एकही भाग असा नाही की जिथे हे दुचाकीस्वार आपल्या बाईकच्या ‘ गुणांचा ‘ परिचय देत नाहीत. शाळा आणि कॉलेजच्या परिसरात तर या दुचाकीस्वारांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे.

नगर शहरातील ऑटोमोबाईल मार्केट म्हणून ओळख असलेल्या सर्जेपुरा परिसर आणि लालटाकी परिसरात अशा गाड्या मॉडीफाय करून देणाऱ्यांची काही कमी नाही. मॉडीफाय केलेल्या गाडीला आरटीओकडून कुठलीही मान्यता नसली तरीदेखील आगळ्यावेगळ्या प्रकाराने स्वतःची क्रिएटिव्हिटी सिद्ध करण्याच्या नादात फटाक्याचा आवाज असलेले सायलेन्सर बसवणे, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आणि त्याची फायरिंग याचातील बॅलन्स बनवून अशा गाड्या मॉडीफाय केल्या जात आहे. दिवसा आणि रात्री ध्वनिप्रदूषणाची पातळी किती असावी याचे काही नियम आहेत मात्र या नियमाकडे सर्रास उल्लंघन केले जात असून नागरिक देखील हतबल झाले आहेत .