
नगर शहरात काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर या बालकाचा त्या दुर्दैवी मृत्यू झालेला होता. शहरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून रात्रीच्या वेळी घरी जाणे देखील अवघड झालेले आहे. दिवसा लहान मुलांवर ही कुत्री हल्ला करतात मात्र रात्रीच्या वेळी दिसेल त्या व्यक्तीवर धावून जातात त्यामुळे अपघात देखील घडलेले आहेत.
नगर महापालिकेने या प्रकरणावर कुठलीही कारवाई अद्यापपर्यन्त केलेली नाही. महापालिकेचे अधिकारी आणखी एखादा बळी जाण्याची वाट पाहत आहेत का ? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील काही महाभाग मोकाट कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालण्याचे उद्योग करत असून त्यातून मुबलक अन्न मिळत असल्याने त्यांचे प्रजनन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. कुत्राप्रेमी व्यक्ती आपण किती प्राणीप्रेमी आहोत असे दाखवण्यासाठी असले उद्योग करतात मात्र त्यांच्या या नादात त्याचे परिणाम इतर निष्पाप लोकांना भोगावे लागत आहेत.
न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या या व्यक्तींनी त्यांनी हल्ला केल्यास जखमी झालेल्या व्यक्तीचा खर्च त्यांनी उचलावा असा निर्णय दिला होता मात्र नगर शहरात महापालिका अधिकारीदेखील या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही. नगर शहरातील पाईपलाईन रोड, शिलाविहार, सिव्हिल हडको, दिल्लीगेट, तोफखाना, सर्जेपुरा, मुकुंदनगर, फकीरवाडा येथील अनेक नागरिक एमआयडीसी इथे कामाला जातात. रात्री अपरात्री त्यांना घराबाहेर पडावे लागते मात्र दबी धरून बसलेली ही कुत्री अचानकपणे त्यांच्यावर हल्ला करतात त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे . आमच्याकडे माणसे कमी आहेत एवढेच कारण महापालिकेकडून ऐकून ऐकून आता नगरकरांना देखील कंटाळा आला आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरांचा देखील उपक्रम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही सोकावलेले पशूपालक दिवसा आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडून देतात आणि रात्री त्यांना घरी घेऊन जातात. ही मोकाट जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून राहतात त्यामुळे अनेकदा अपघात देखील झाले आहेत. पावसामुळे सध्या बसण्यासाठी इतरत्र चिखल असल्याने डांबरी रोडवर ही जनावरे आपली बैठक मांडत असून नागरिकांना वाहन चालवणे देखील मुश्किल झालेले आहे तर महापालिकेकडे आमच्याकडे माणसे नाहीत हेच उत्तर देण्यात येत आहे. अहमदनगर हे शहर आहे का प्राणिसंग्रहालय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.