संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश

टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महंत सुनील महाराज हे शिवसेनेत दाखल होतील अशी चर्चा होती त्यानंतर महाराजांनी स्वतः समोर येऊन शिवबंधन बांधले आहे. बंजारा समाजातील सुमारे 80 टक्के समाज हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असाही दावा त्यांनी केला आहे. बंजारा समाजाचे समाजहिताचे प्रश्न घेऊन आपण मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात गेलो होतो मात्र चार तास मला थांबून धरण्यात आले आणि दहा मिनिटे देखील मला वेळ देण्यात आला नाही असाही आरोप त्यांनी केलेला आहे.

महंत पुढे म्हणाले की, संजय राठोड यांची देहबोली आणि त्यांची वृत्ती याच्यावरून माझी उपस्थिती हीच त्यांना खटकत होती असे देखील मला दिसून आले. आपण त्यांना आतापर्यंत सहकार्य केले. सामाजिक धार्मिक कार्यात आपण त्यांच्यासोबत राहिलो मात्र राजकीय मैदानात यापुढे संजय राठोड आणि मी यांच्यात पूर्वीसारखे संबंध राहणार नाहीत. बंजारा समाजाला सत्तेत वाटा मिळण्यासाठी बहुजन आणि बंजारा समाजाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केलेला आहे असेही त्यांनी म्हटले आहे .