रात्री उशिरा येऊन हॉटेल व्यावसायिकाला ‘ वडापाव ‘ बनवून मागितला , नकार देताच..

नगर शहर आणि परिसरात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांना रात्री-अपरात्री येऊन खाण्याच्या पदार्थांची मागणी करण्यात येते आणि हे पदार्थ दिले नाही तर दमदाटी शिवीगाळ करून अशा चालकांना मारहाण करून आरोपी पलायन करतात . असाच एक प्रकार सध्या केडगाव येथे समोर आलेला असून रात्री उशीरा आल्यानंतर आरोपींनी हॉटेल चालकाकडे वडापावची मागणी केली होती मात्र इतक्या उशिरा वडापाव शिल्लक नाही हे ऐकल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून क्रीम रोल खाल्ले मात्र पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी चालकाला दमदाटी करून पलायन केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गणेश रावसाहेब धरम ( राहणार मोहिनी नगर केडगाव ) असे जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री तीन जण त्यांच्या हॉटेलवर आले होते त्यावेळी त्यांनी गणेश यांच्याकडे वडापाव खाण्याची मागणी केली मात्र गणेश यांनी आता वडापाव देणे शक्य होणार नाही असे सांगितले त्यानंतर आरोपींनी आत्ता खाण्यास काय आहे असे विचारल्यानंतर गणेश यांनी त्यांना क्रीमरोल दिले ते आरोपींनी फस्त केले.

क्रीम रोल खाऊन झाल्यानंतर गणेश यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी गणेश यांना दमदाटी केली आणि या तिघांपैकी एकाने गणेश यांच्यावर चाकूने हल्ला केला. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याने परिसरात गणेश यांच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. नगर शहरातील हॉटेल व्यावसायिकांना उशिरा मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून चारचाकी पॉश गाडीत देखील असे अनेक जण फिरत असल्याने पोलिसांना देखील त्यांच्यावर संशय येत नाही.

केडगाव परिसरात देखील पोलिसांची गस्त सुरू असते मात्र अनेकदा असे प्रकार करणारे तरुण हे उच्चभ्रू कुटुंबातील देखील असल्याचे दिसून येते. चार चाकी गाडीत फिरत हे मद्यधुंद तरुण हॉटेल व्यावसायिकांना पाहिजे ती वस्तू हॉटेल बंद झाल्यानंतर देखील बनवून देण्याची मागणी करतात आणि ती दिली नाही तर त्यांना चक्क दमदाटी करत मारहाण देखील करण्यात येते त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी विनाकारण चार चाकी गाडीत फिरणाऱ्या व्यक्तींवर देखील लक्ष ठेवण्याची गरज असून अनेकदा हॉटेल व्यावसायिक देखील वाद नको म्हणून पोलीसांपर्यंतही जात नाहीत.