शौचालयाला जाऊन येते म्हणून गेली ती आलीच नाही , राहुरीतील घटना

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहुरी येथे उघडकीला आली असून पारनेर तालुक्यातील एका मुलाने लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी बिरू बिरजू भांड नावाच्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राहुरी परिसरात रहिवासी असलेली एक 14 वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहत असून 18 सप्टेंबर रोजी ती शौचालयाला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली होती मात्र बराच वेळ ती घरी आली नाही म्हणून तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. नातेवाईकांकडे देखील तिच्या संदर्भात चौकशी केली मात्र ती मिळून आली नाही.

आपल्या मुलीला बिरू भांड याने पळवून नेले आहे असा आरोप मुलीच्या वडिलांनी केलेला असून त्यानंतर राहुरी पोलिसात यांनी संशयित आरोपी बिरु बिरजू भांड ( राहणार धोत्रे तालुका पारनेर ) याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला असून पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील तपास करत आहेत.