पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा वाद यंदाही ? , महंत म्हणतात की ?

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा यंदाही वादात सापडलेला असून भगवानगडावर कोणताही राजकीय मेळावा होणार नाही. गडाला कोणत्याही वादात विनाकारण ओढू नका. राजकारण विरहित गड हे धोरण पक्के आहे त्यामुळे गडावरच नाहीतर गडाच्या आसपास देखील गड मालकीच्या जागेत कोणताही राजकीय मेळावा होणार नाही, असे भगवान गडावरील महंत डॉक्टर नामदेव शास्त्री सानप यांनी सांगितले आहे.

याआधी देखील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवानगडावर घेण्यावरून वाद निर्माण झालेला आहे . डॉक्टर नामदेव शास्त्री सानप यांनी बोलताना ‘ भगवानगडच काय पण गडाची मालकी असलेल्या कोणत्याही जागेत कुठलाही राजकीय मेळावा होणार नाही. गडाला राजकीय वादात ओढू नये. गडाची शांतता अबाधित राखा. दसरा मेळावा म्हणजे सीमोल्लंघन सोहळा असतो ही गडाची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असून हा सोहळा म्हणजे गडाची मालमत्ता आहे . राजकीय प्रवाहापासून गड अलिप्त राहावा असे धोरण असून त्यात कुठलाही बदल झालेला नाही. गडाची शांतता आणि परंपरेला बाधा पोहोचू नये यासाठी आपण तालुका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला कळवले आहे, ‘ असेही ते म्हणाले.

नामदेव शास्त्री सानप यांनी पंकजा मुंडे यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा रोख हा पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळावासंदर्भातच असल्याची चर्चा आहे. काही संघटनांनी एकत्र येऊन भगवान गडाच्या पायथ्याला मेळावा घेण्याबाबत बैठका सुरू केलेल्या आहेत मात्र गड हा कुठल्याही राजकीय मेळाव्यापासून दूर राहावा अशी सर्व भाविकांची इच्छा आहे, असा देखील दावा त्यांनी केलेला आहे.