‘ माझी काय चूक ? ‘, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डुप्लिकेट कोर्टात

‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यासारखा आपला चेहरा आहे ही काही आपली चूक नाही ‘ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डुप्लिकेट विजय माने यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. विजय माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करत सार्वजनिक कार्यक्रमात जातात मात्र त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा बदनामी देखील होते म्हणून पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता .

विजय माने यांच्या म्हणण्यानुसार, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा मी दिसतो त्यात माझा काय दोष ? ‘ असा युक्तिवाद करत आपल्या विरोधातील गुन्हे तातडीने रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यांच्या या विनंतीवरून पुणे पोलिसांना कोर्टाने नोटीस जारी केली आहे त्यामध्ये त्यांचे म्हणणे 18 ऑक्टोबरपर्यंत मांडण्यास सांगितलेले आहे.

मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती त्या वेळी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. विजय माने हे उच्चशिक्षित असून पुणे शहरात राहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे ते सेम टू सेम दिसत असल्याने अनेक नागरिक त्यांना कार्यक्रमासाठी देखील बोलावतात आणि मुख्यमंत्री शिंदे समजून त्यांना मानदेखील दिला जातो. पुण्यातील एका प्रसिद्ध गुंडासोबत त्यांचा फोटो व्हायरल झालेला होता त्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली आणि पुणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्याच्या विरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.