नगरमध्ये भररस्त्यात दुहेरी हत्याकांड , जावयाच्या हल्ल्यात पत्नी अन सासऱ्याचा मृत्यू

नगर येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून शहरातील तपोवन रोड परिसरातील भिस्तबाग महाल येथे कौटुंबिक वादातून जावयाने पत्नी आणि सासऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. भररस्त्यात पत्नी आणि सासर्‍याला लोखंडी पाईपने जावयाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले होते. तीन तारखेला ही घटना घडली होती त्यामध्ये गंभीर जखमी झालेली पत्नी कीर्ती भेटे हिचा सहा तारखेला मृत्यू झालेला असून तिचे वडील असलेले विश्वनाथ कसबे यांचादेखील सात तारखेला सकाळी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सदर घटनेतील मुख्य आरोपी महेश माणिक भेटे ( राहणार ढवण वस्ती अहमदनगर ) याला पोलिसांनी याआधीच अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत कीर्ती हिचा महेश याच्यासोबत चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्या लग्नाला घरातून विरोध असल्याने महेश आणि कीर्ती हे वेगळे राहत होते मात्र महेश हा लग्न झाल्यापासून तिला सतत त्रास देत होता. सासरे विश्वनाथ कसबे यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार देखील दिली होती. तक्रारदार असलेल्या सासू यांनी आपल्याला महेश याचा पोलीस दलात कार्यरत असलेला भाऊ याने पोलिसात जाऊ नका अशा स्वरूपाची धमकी देखील दिली होती असे म्हटले आहे.

कीर्ती हे एका खाजगी रुग्णालयात काम करत होती त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्यानंतर महेशने तिला मारहाण केली आणि तो घरातून निघून गेला त्यानंतर कीर्ती एकटीच राहत होती. तोफखाना पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देखील देण्यात आली होती. कीर्तीचे वडील विश्वनाथ कसबे यांनी कीर्ती हिला फोन केला आणि सणासुदीचे दिवस असल्याने तू एकटीच घरी राहू नकोस मी तुला माहेरी घेऊन येतो असे सांगून तिला घेण्यासाठी गेले होते.

महेशची सासु घरी असताना त्यांना महेश याने कीर्ती आणि तिच्या वडिलांना भिस्तबाग महाल परिसरात जोरदार मारहाण केल्याची माहिती समजली त्यावेळी त्यांनी तिथे धाव घेतली आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात अपयश आले असून संतापाच्या भरात झालेल्या या प्रकारात आरोपीच्या पत्नीला आणि सासर्यांना प्राण गमवावे लागले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी महेश भेटे याच्या विरोधात सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला होता मात्र त्यानंतर आता खुनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याचे समजते.