नगरकरांच्या घरापुढे सर्रास पोपटाचे पिंजरे , वनविभागाला कधी येणार जाग ?

अनेक जणांना आपल्या घरात प्राणी पक्षी पाळण्याची हौस असते मात्र त्यासाठी असलेल्या नियमावलीचा बहुतेकांना अंदाज नसल्याने देशातील संरक्षित वन्यजीव देखील नागरिक घरात कोंडून ठेवत आहेत. सर्वसाधारणपणे जे प्राणी-पक्षी भारतीय वातावरणात सहजरित्या राहू शकतात अशा प्राण्यांना आणि पक्षांना कैद करून ठेवणे गुन्हा असून अनेक नागरिकांना त्याची कल्पनाच नाही. भारतीय वन्यजीवन कायदा 1972 प्रमाण त्यामध्ये तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा असून वनविभागाचे देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष झालेले असून इतर देशातील पक्षी प्राणी पाळण्यास मात्र बंदी नाही .

नियमाप्रमाणे एकही भारतीय पक्षी आपल्याला घरात पाळण्यास परवानगी नाही मात्र अनेक नागरीक घरात पोपट, साळुंकी, चिमण्या यासारखे पक्षी पाळत असून वन्यजीव कायदा 1972 नुसार तो गुन्हा असून त्यामध्ये तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आहे. वनविभागाकडून देखील याप्रकरणी कुठलीच जनजागृती केली जात नसल्याने केवळ जुजबी एखादी कारवाई करण्यापलीकडे वनविभाग फारसे लक्ष देत नाही त्यामुळे आपल्या भारतीय पक्षांवर बंदी अवस्थेत जगण्याची वेळ आलेली आहे. पोपट, कासव, साळुंकी, चिमण्या यासारखे प्राणीपक्षी अनेक जण आपल्या घरामध्ये कैद करून ठेवत आहेत.

ग्राहक हौस म्हणून पोपट विकत घेतात आणि पाळतात तसेच व्यवसायात वृद्धी व्हावी म्हणून अंधश्रद्धेतून कासव देखील घरात आणून ठेवतात त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही मात्र केवळ अंधश्रद्धेतून या प्राण्यांना तुरुंगवास सहन करावा लागत आहे . पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा मांजर पाळणे सोईस्कर असले तरी त्यांचा योग्यरीत्या सांभाळ करणे अवघड होत असल्याने केवळ हौस इतर प्राण्यांना आणि पक्षांना नागरिक कैद करून ठेवत आहेत.घराच्या बाहेर देखील अनेकजण पोपटाचे पिंजरे लटकवून ठेवतात मात्र वनविभागाकडून याप्रकरणी कारवाई केली जात नाही. पोपटांची पिल्ले विकणाऱ्या व्यक्तींवर किरकोळ स्वरूपाची कारवाई केली जाते मात्र वनविभागाने लक्ष घातल्यास मोठ्या प्रमाणात या पक्षांची सुटका होऊ शकेल तसेच त्यांची नैसर्गिक साखळी अबाधित राहील.

कासवाच्या देखील अनेक प्रजाती आहेत मात्र आपण विकत असलेले कासव हे बंदी नसलेले आहे असे सांगत पेट शॉपकडून या कासवांची विक्री केली जाते तर ग्राहक देखील पक्षी म्हणून सर्वप्रथम पोपटाला प्राधान्य देतात. मुळातच पोपट हा वर्षातून एकदाच पिले जन्माला घालतो त्यातही तीन ते चार पिले जास्तीत जास्त जन्माला येतात आणि काही समुदाय त्याच्या ढोलीत जाऊन ही पिल्ले घेऊन जातात. इतरत्र गेलेली पिले पिंजऱ्यात राहत असल्याने पुन्हा पिले जन्माला घालत नाहीत त्यामुळे पोपटांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. इंडियन रिंगनेक हा अत्यंत गोड आणि देखणा पक्षी असून तो लुप्त होण्याची देखील भीती त्यामुळे निर्माण झालेली आहे .