.. तर उद्धव ठाकरेंचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी करणार

शेअर करा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळाव्यात भाजपच्या नेत्यांबाबत करण्यात आलेली ही वक्तव्ये पुन्हा करू नयेत नाहीतर उद्धव ठाकरे यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असून त्यांच्या संपत्तीची देखील चौकशी संबंधित यंत्रणेकडे करण्यात यावी अशी मागणी आपण करणार आहोत असे केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलेले आहे. मुंबई येथील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले नारायण राणे ?

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर अनेक वक्तव्य केलेले असून राज्यात कुठेही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सभा होऊ देणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे वारस असल्याचे सांगण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. शिवसेनेसाठी कष्ट करणाऱ्या आणि प्रसंगी कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष करून पोलीस कारवाईची प्रकरणे आम्ही आणि एकनाथ शिंदेसारख्या शिवसैनिकांनी अंगावर घेतलेली आहेत.

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्यांना समजली नाही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणावर बोलण्याचा प्रयत्न करू नये. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे. दाऊदशी संबंध असलेल्या नबाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदावरून दूर केले नाही. शिवसेना सोडल्यानंतर छोटा शकीलपासून अनेक गुंडांना आपल्याला मारण्याचा सुपार्‍या त्यांनी दिलेल्या होत्या मात्र त्यातून मी स्वतःचे रक्षण केले. रमेश मोरे जयंत जाधव आणि ठाण्यातील आणखी एका नगरसेवकाच्या हत्येमागे कोण आहे याचा देखील आता तपास केला जाईल.

अंकिता भंडारी हिच्या मृत्यूबाबत उद्धव ठाकरे सध्या बोलत असून दिशा सालियान आणि सुशांत सिंह यांच्या आत्महत्येचे काय ? . उद्धव ठाकरे त्यांची पत्नी मुले आणि त्यांच्या पत्नीचे पाटणकर कुटुंबीय यांच्यासाठीच काम करत असल्याने ठाकरे घराण्यातील अन्य कोणीही त्यांच्यासोबत नाही. शिंदे आणि ठाकरे हा विषय सोडून देऊन जनतेच्या विकासाच्या प्रश्नासाठी वेळ देणे गरजेचे आहे असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा