‘ शास्तीमाफी ‘ देऊनही खडखडाटच , किरकोळ कारवाई करून किती दिवस पाठ थोपटून घेणार ?

शेअर करा

मालमत्ताधारकांना तब्बल शंभर टक्के शास्ती माफी दिल्यानंतर देखील वसुलीसाठी नगरकरांनी महापालिकेला ठेंगा दाखवलेला असून महापालिकेचे अर्थचक्र सध्या पूर्णपणे बिघडलेले आहे. मनपाची तब्बल 182 कोटी रुपयांची थकबाकी असून अद्यापही नगरकर महापालिकेत पैसे भरण्यासाठी इच्छुक दिसून येत नाहीत . महापालिकेच्या विकास कामांना याचा मोठा फटका बसत असून महापालिकेकडे सध्याच्या परिस्थितीत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी देखील तिजोरीत खडखडाट आहे.

महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी थकबाकीदार असलेल्या करदात्यांना शंभर टक्के शास्तीमाफी दिली होती त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस थोडी बऱ्यापैकी वसुली झाली मात्र त्यानंतर पुन्हा वसुलीला घरघर लागलेली असून अनेक थकबाकीदारांनी पुन्हा एकदा महापालिकेला ठेंगा दाखवलेला आहे. करवसुली हेच महापालिकेच्या उत्पन्नाचे सध्या मुख्य साधन असून इतर असलेली साधने जसे जकात वगैरे कधीच बंद झालेले आहेत .

राज्यात देखील सध्या सत्ताबदल झाल्याने विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी महापालिकेला प्राप्त होत नाही. सध्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्याची किरकोळ डागडुजी करण्यासाठी देखील महापालिकेकडे पैसे शिल्लक नसल्याचे चित्र आहे. थकबाकीदार असलेल्या व्यक्तींची मालमत्ता जप्त करण्यासाठी महापालिकेने आक्रमकपणे पावले उचलण्याची गरज आहे मात्र अनेक ठिकाणी राजकीय लुडबूड असल्याने महापालिका अधिकारी चालढकल करत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ स्वरूपाची एखादी कारवाई करून महापालिका अधिकारी किती दिवस पाठ थोपटून घेणार ? असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.


शेअर करा