सुरत चेन्नई महामार्गाच्या बाधीत शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नगर जिल्ह्यातून बहुचर्चित असलेला सुरत चेन्नई महामार्ग जाणार असून या महामार्गाच्या मोजणीसाठी मात्र शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात यावी म्हणून राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द, राहुरी बुद्रुक, सडे, खडांबे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेतली आणि आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत, ‘ सुरत- चेन्नई या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाची आपल्या गावातील मोजणी होऊ द्या मोजणीला विरोध करू नका. आपल्या मागण्यांची योग्य ती दखल घेतली जाईल. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मोजणी झाल्याशिवाय ताबा दिला जाणार नाही. आपल्या प्रत्येक नुकसानीची नोंद घेऊन घेऊ फक्त मोजणीला अडथळा करु नका, ‘ असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद होऊन त्यानंतर नुकसान भरपाईचा निर्णय घेतला जाईल. राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन कायद्यानुसार सध्याचे भूसंपादन होत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समोर ही बाब आणली जाईल आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे देखील त्यांनी सांगितले . जोपर्यंत मोजणीच होत नाही तोपर्यंत नक्की कुणाचे किती नुकसान होत आहे हे देखील स्पष्ट होणार नाही. नुकसानीच्या चारपट मोबदला दिला जाणार आहे असे देखील त्यांनी पुढे सांगितले.

संपादनाचा मोजणी दर आधी जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. राहुरी परिसरातील टप्पा हा बागायती असून उताऱ्यावर मात्र त्याची नोंद जिरायत अशी आहे. त्या नोंदीची दुरुस्ती करण्यात यावी. सदर भूसंपादन प्रक्रियेत अनेक पाईपलाईन देखील बाधित होणार असून घरांचे देखिल नुकसान होणार आहे तसेच काही शेतकऱ्यांकडे अवघी काही गुंठे जमीन शिल्लक राहणार आहे यावर देखील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त करत डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले.