इडली विक्रेत्याकडे बनावट नोटांचे घबाड , अत्यल्प दरात होत होती विक्री

शेअर करा

नोटबंदी झाल्यानंतर बनावट नोटांना आळा बसेल हा भ्रम ठरलेला असून अनेक ठिकाणी बनावट नोटा आढळून आलेल्या आहेत. गुजरात येथे एका ऍम्ब्युलन्समध्ये काही कोटींची रक्कम आढळल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक येथे चक्क बनावट नोटा विक्री करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी या बनावट नोटा विक्रीचा पर्दाफाश केला असून परप्रांतीय असलेल्या एका इडली विक्रेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून पाच लाखांचे बनावट चलन जप्त करण्यात आलेले आहे.

मुंबईनाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मलायारसन मदसमय ( वय 37 मूळ राहणार तामिळनाडू ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नवरात्रात सदर प्रकाराचा बोभाटा झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली होती त्यावेळी भारत नगर परिसरातील एक इडली विक्रेता अत्यल्प दरात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करत असल्याचे पथकाला समजलेले होते त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई केली.

आरोपी गेल्या 15 वर्षांपासून शहरात वास्तव्याला असून इडली विक्री करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याने आणलेल्या नोटा कुठून आणि कशा आल्या तसेच या नोटांची छपाई नक्की कोणी केली याचादेखील पोलीस शोध घेत आहेत सोबतच या रॅकेटमध्ये सहभागी असलेले त्याचे इतर साथीदार कोण यांचा देखील पोलीस तपास करत आहेत. सहा तारखेला संध्याकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या 40 तर दोन हजार रुपये किमतीच्या तब्बल 244 अशा एकत्रित सुमारे पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आलेल्या आहेत.


शेअर करा