पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची अखेर जिल्ह्याबाहेर बदली

अहमदनगर जिल्ह्यात ऑक्टोबरदरम्यान पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली असून भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्येचे प्रकरण घडल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुनील धोंडीबा मोरे यांनी देखील राहत्या घरी आत्महत्या केली होती. सदर प्रकार हा सहकारी व्यक्तींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून घडल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर वादात सापडलेले पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक ग्रामीण पोलिसात बदली करण्यात आलेली आहे. त्यांचा तात्पुरता पदभार श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.

नगर जिल्ह्यातील अत्यंत खळबळजनक अशी ही दोन्ही प्रकरणे असून पोलिस दलातील वसुली कांड आणि अंतर्गत राजकारण या दोन्ही प्रकरणांनी चव्हाट्यावर आले आहे. मयत सुनील मोरे यांची पत्नी असलेल्या किर्ती मोरे यांनी पतीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन पोलीस महासंचालक तसेच विभागीय पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे.

नंदकुमार दुधाळ यांनी आपल्या पतीला कायम कामकाजात त्रास दिला त्याला वैतागून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप कीर्ती मोरे यांनी केलेला असून पोलीस दलात घडत असलेले हे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहेत. पोलीस दलात वसुलीच्या जागेवर होणाऱ्या नेमणुका आणि आपल्या मर्जीतील व्यक्तीची नेमणूक अशा ठिकाणी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न यातून अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर येत असून पोलिस दलातील वसुली कांडाचा देखील पर्दाफाश होत आहे.

एक जबाबदार नागरिक म्हणून पोलिसांपर्यंत गुन्हा घडण्याआधी गेले असताना पोलिसांकडून गुन्हा काही झालाच नाही . गुन्हा झाल्यावर आमच्याकडे या असे देखील सांगण्यात येत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहे त्यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र गुन्हा घडल्यानंतरच पोलिस यंत्रणेला जाग येते असे या प्रकरणावरून समोर आलेले आहे. पोलीस दलातील अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या त्रासाला जर पोलीसच न्याय देऊ शकत नसतील तर सामान्य नागरिकांना कुणी वाली राहिलेला नाही म्हटल्यास वावगे ठरू नये.