नगरच्या ‘ हिवसाळ्याला ‘ नागरिक कंटाळले , खराब रस्त्यांनी नागरिक हैराण

शेअर करा

नगर शहरात आणि जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीदेखील पावसाचे थैमान सुरूच आहे. शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागलेली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील दाट वस्ती असलेल्या परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलेच होते मात्र आता ग्रामीण पातळीवर देखील ओढ्या नाल्यांना पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे.

ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी देखील पावसाचे थैमान जोरदार सुरू असून काल आणि आज देखील दुपारी जोरदार पावसाने नगरकरांना झोडपले. अचानकपणे जोरदार सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली तर शहरातील पाणी वाहून जाणाऱ्या चौपाटी कारंजा, तोफखाना, दिल्ली गेट, नालेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. शहरातील सर्व रस्त्यांवर मोठे खाच-खळगे झाले असून त्यामध्ये पाणी साठून राहत असल्याने वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

शहरात उन्हाळ्यात काही प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली होती. महापालिकेने या कामाची यादी देखील जनतेसमोर मांडली होती. त्या कामाच्या दर्जावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्ह्यात आणि शहरात झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत असून जिल्ह्यातील नागरिक आता पावसाला कंटाळलेले असून असल्याचे दिसून येत आहे.


शेअर करा