‘ निव्वळ नोटीस पाठवून हात वर ‘ , मनपाचा बुलडोझर फक्त गोरगरिबांवरच का ?

नगर शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढलेली असून महापालिकेकडून कुठलीही कारवाई करत केली जात नसल्याने नगरकर (नावापुरती बांधकाम मंजुरी घेऊन ) जमेल तसे बांधकाम करून रस्ते आणि आणि ओपन स्पेस देखील अतिक्रमण करून हस्तगत करत आहेत. महापालिका सुरुवातीला तक्रार आल्यानंतरच नोटीस पाठवते अन यानंतर नोटिशीला उत्तर देण्यात येते. अपेक्षित उत्तर नसेल तर महापालिकेकडून बांधकाम काढून टाकण्यास किंवा नियमित करून घेण्यास नोटीस दिली जाते मात्र समोरील व्यक्ती अशा नोटिशीला काही मोजत नाही अन त्यानंतर रहस्यमयरित्या कुठलीही कारवाई होत नाही. हा प्रकार नगरकरांना आता चांगलाच परिचयाचा झालेला असून महापालिकेच्या ‘ कार्यक्षम’ कारभाराची चौकशी करण्याची मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे

नगर शहरातील गौरी घुमट परिसरात एका माजी नगरसेवकाचे सर्व बांधकाम अतिक्रमण अनधिकृत ठरवून महापालिकेच्या उपायुक्तांनी ते पाडण्याचा आदेश दिलेला आहे. सदर व्यक्तीने कोणतीही परवानगी न घेता तब्बल तीन मजली आरसीसी बांधकाम केले. त्या इमारतीमध्ये त्यांनी भाडेकरू देखील टाकले आणि महापालिकेची घरपट्टी देखील बुडवून टाकली तसेच जाण्याच्या रस्त्यात ओटा बांधून वाहतुकीला देखील अडथळा निर्माण केला. इतके सगळे प्रकार होईपर्यंत महापालिका शांत होती मात्र एडवोकेट गजेंद्र दांगट यांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेला अचानक जाग आली.

महापालिकेने संबंधित माजी नगरसेवकाला नोटीस पाठवून त्यामध्ये संबंधितांनी अतिक्रमित आणि अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी सर्व बांधकाम काढून घ्यावे अन्यथा पालिकेमार्फत पाडण्यात येईल आणि त्यासाठी झालेला खर्च वसूल करण्यात येईल अशी नोटीस या माजी नगरसेवकाला पाठवलेली असून खरोखरच महापालिका येत्या काळात ही कारवाई करेल का ? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

महापालिका अधिकारी अतिक्रमीत बांधकाम आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी तयारच होत नाही. ‘ तू बांधत राहा काही अडचण आली तर बघू ‘ अशा पद्धतीतून अधिकारी वर्गाकडूनच पाठराखण असल्याची शक्यता नागरिक आता समोर येऊन बोलून दाखवत आहेत. शहर आणि उपनगरातील अनेक रस्ते सरसकट अनधिकृत बांधकाम यांनी हडप केले आहे तर ओढेनाल्यांवर देखील टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या मदतीशिवाय हे शक्य नाही त्यामुळे आता महापालिका कारवाई करणार की नेहमीप्रमाणे नोटीस पाठवून हात वर करणार हे येत्या काळात पहावे लागेल. महापालिकेच्या आयुक्तांनी हा आदेश जारी दिलेला असला तरी त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम प्रभाग समिती आणि अतिक्रमण विभाग करतो त्यामुळे येत्या काळात खरोखरच कारवाई होईल का ? हे पाहावे लागेल.