नगर शहरासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नोव्हेंबर अखेरीस त्याचे लोकार्पण होण्याचा अंदाज आहे. उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकांना माहीत व्हावा म्हणून ऐतिहासिक चित्रे रेखाटण्यात आली आहे मात्र पोस्टरबाजांना याच्याशी काही घेणे-देणे नसून शिवाजी महाराज यांचे रेखाटन असलेल्या चित्राच्या खाली एका महाभागाने पोस्टर चिटकवण्याचे काम केलेले आहे .
शहरातील अनेक नागरिकांनी याविषयी संताप व्यक्त केला असून अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आलेला असून सदर आरोपी महाभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राखाली आपली व्यावसायिक जाहिरात केली होती . पिलर नंबर 64 वर त्याने आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीचे पोस्टर लावलेले होते. काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी खबर देण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.