‘ जुन्या नोटा बदलून देतो ‘ म्हणत व्यावसायिकाला नवी मुंबईला बोलावले अन..

शेअर करा

नोटबंदी झाल्यानंतर लाखो कुटुंबीय रस्त्यावर आलेले आहेत हे सत्य मान्य करण्याची केंद्राची तयारीच नाही मात्र त्यातून फसवणुकीचे देखील प्रकार आता समोर येत आहेत. अनेक जणांकडे जुन्या नोटा पडून असल्याने काहीतरी करून या नोटा बदलून देऊ अशा पद्धतीने आता चक्क रॅकेटदेखील कार्यरत झालेले आहेत. असाच एक प्रकार नवी मुंबईत समोर आलेला असून आरबीआयच्या ट्रेझर मार्फत नोटा बदलून घेण्याच्या बहाण्याने गुजरात येथील एका व्यावसायिकाला तब्बल साडेतीन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. आरोपींनी त्यांच्याकडून प्रत्येकी पन्नास लाखांचे दोन चेक देखील घेतले आणि त्यानंतर नवी मुंबईतून पलायन केले. सीबीडी पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर व्यावसायिक हे गुजरात येथील रहिवासी असून वापी परिसरात त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जुन्या नोटांची रक्कम असल्याने आरोपींनी त्यांच्यासोबत ओळख वाढवली आणि आरोपी विशाल विरोजा, कादरी , सुशांत कुलकर्णी तसेच इतर तीन ते चार लोकांनी त्यांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार असलेले ठाकूर यांना त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यासाठी नवीन नोटा हव्या होत्या त्यामुळे त्यांच्या एका मित्राच्या माध्यमातून विशाल याच्यासोबत त्यांची ओळख झाली होती यानंतर विशालच्या माध्यमातून इतरही आरोपींची ठाकूर यांच्यासोबत ओळख झाली.

सदर टोळीने ठाकूर यांना नवी मुंबईत बोलावले. साडेतीन कोटी रुपयांच्या नोटा बदली करून देण्याच्या बहाण्याने जुन्या नोटा आपल्याकडे घेतल्या आणि त्यानंतर तिथून निघून गेले. पुढे गेल्यानंतर त्यांनी क्राईम ब्रँच आणि आरबीआयच्या टीमने या नोटा पकडल्याचा बहाना केला तसेच नवरात्रीनंतर नोटा देऊ असे सांगून त्यांना टाळण्याचा देखील प्रयत्न केला. ठाकूर यांनी झाले गेले सोडून माझे पैसे मला परत द्या असे सांगितल्यानंतर सुशांत कुलकर्णी याने एक कोटी रुपये ठाकूर यांना दिले मात्र काही दिवसात तुमची पूर्ण रक्कम परत देऊ म्हणून एक कोटी रुपये आणि एक कोटींचा चेक आणून देतो असे सांगितले.

ठाकूर हे मागील आठवड्यात नवी मुंबई येथे आले असताना विशाल आणि सुशांत याचा चालक असलेल्या तीन जणांनी त्यांच्याकडील एक कोटीची रक्कम आणि प्रत्येकी पन्नास लाख रुपये किमतीचे दोन चेक घेऊन पलायन केले. दोन तासात आम्ही परत येऊ असे त्यांनी सांगितले होते मात्र ते परत आले नाहीत त्यानंतर ठाकूर यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे .


शेअर करा