उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा म्हणजे निव्वळ फार्स , राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की..

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पीक नुकसानीचा पाहणी दौरा म्हणजे निव्वळ फार्स असून जे अडीच वर्ष घरात बसले ते आता शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायला निघालेले आहे असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. राधाकृष्ण विखे पाटील सध्या पाहणी दौऱ्यावर असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतलेला आहे तसेच शेतकऱ्यांना सर्व पद्धतीची मदत केली जाईल असे देखील सांगितले आहे.

राहता इथे पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, ‘ अडीच वर्षे घरात बसून ‘ माझे कुटुंब तुमची जबाबदारी ‘ असे म्हणून ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. ते आता पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर जात आहे ही आश्चर्याची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विषयक धोरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून उत्पादनाला दुप्पट हमीभाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे त्यामुळे आपले तारणहार फक्त पंतप्रधान मोदी हेच आहेत अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे.

नाल्यातील पाणी गावांमध्ये शिरले याला फक्त अतिक्रमणे कारणीभूत असून पाण्याचे वाहते प्रवाह बंद झाल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सरकारी जागा ओढे आणि नाल्यावर असलेले अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना आपण दिलेल्या असून जुने नकाशे काढून नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ‘ असेही ते पुढे म्हणाले.