‘ त्या ‘ वाहनांवर कारवाई कधी ? अपघात होण्याचा धोका

नगर जिल्ह्यात सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम काही ठिकाणी सुरू झालेला असून या कारखान्यांसाठी गावांमधून ट्रॅक्टर आणि बैलगाडी तसेच ट्रकच्या माध्यमातून उसाची वाहतूक केली जाते . सदर वाहने हे अनेक बाबतीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरणे त्यानंतर विना पासिंग डबल ट्रॉली, जोरदार मोठ्या आवाजात जोडलेली म्युझिक सिस्टिम आणि भरधाव वेगाने वाहन चालवत जाणे तसेच गाडीला रिफ्लेक्टर देखील नसणे यामुळे मोठ्या अपघाताचा धोका होऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांकडून या वाहनांच्या चालकासह मालकावर देखील कारवाईची मागणी करण्यात यावी अशी मागणी जोर पकडत आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरलेला असतो त्यामुळे वाहन चालकाला ओव्हरलोड झालेली गाडी कंट्रोल करणे अवघड जाते. वाहनात मोठ्या आवाजात गाणी लावली असल्याने आलेल्या दुसऱ्या गाडीचा हॉर्न ऐकू येत नाही तसेच वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने रात्री देखील वाहन चालवताना अपघाताची भीती निर्माण झालेली आहे. कारखान्यांकडून या व्यक्तींना सूचना दिल्या जातात मात्र त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे वाहन चालक आणि मालकावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नलगे यांनी केली आहे. वाहन चालवताना रस्त्यावर वाहन थांबल्यानंतर उटी म्हणून लावलेले दगड नंतर रस्त्यावर सोडून दिल्याने रात्रीच्यावेळी वाहनांना त्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होतात त्यामुळे बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.