बायकोला कार शिकवत असताना ‘ असे ‘ काही घडेल याची कल्पना नव्हती

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरात घडलेली असून पत्नीला कार शिकवत असताना कारवरील नियंत्रण सुटून कार चक्क महामार्गाच्या बाजूने असलेल्या एका विहिरीत जाऊन पडली. सदर घटनेत पत्नीसह बारा वर्षीय मुलीचा देखील मृत्यू झालेला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे. सदर घटनेत पती बचावला असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तीन नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता कुंभारी गावाजवळ ही घटना घडलेली असून महिलेचा पती शिक्षक म्हणून कार्यरत आहे. अमोल दिनकर मुरकुट ( वय 40 ) असे पतीचे नाव असून ते देऊळगाव राजा इथे रामनगर परिसरात राहतात. दिवाळीच्या सुट्टीच्या काळात त्यांनी पत्नीला गाडी शिकवण्यासाठी म्हणून घराबाहेर गाडी घेतली आणि त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास शहराबाहेर आले . चिखली महामार्गावर गाडी शिकवत असताना पत्नीचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती मुली आणि पतीसह एका विहिरीत कारसोबत जाऊन पडली. सदर विहिरीचे बांधकाम अर्धवट होते मात्र त्यात तीस फुटापेक्षा अधिक खोल पाणी होते.

कार विहिरीत पडली त्यावेळी हे तिघेही विहिरीत पडले मात्र शिक्षक यांनी कसेबसे करत आपला जीव वाचवला तर या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस यांनी देखील ही कार बाहेर काढून शिक्षकाची पत्नी आणि त्यांची मुलगी यांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र विहिरीत उतरण्यासाठी कोणीही धाडस करीत नव्हते. संजय जनार्दन शिंगणे ( वय 50 ) यांनी विहिरीत उडी घेतली मात्र थंडीने काकडून त्यांचे हात पाय वाकडे झाले त्यानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.