‘ आता त्यांचा विसर पडलाय ‘ , उड्डाणपुलाच्या क्रेडिटवॉरने शहरात वातावरण तापले

नगर शहरातील एकमेव उड्डाणपूल आता लवकरच नागरिकांच्या सेवेत खुला होणार असून तीन किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी केली त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक होऊन गुरुवारी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या उड्डाणपुलाचे खरे श्रेय नगरकरांना आहे त्यामुळे नागरिकांनी उद्घाटन करावे असे म्हटले आहे.

19 नोव्हेंबर रोजी हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला होणार असून नितीन गडकरी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. सोशल मीडियावर माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड यांचे समर्थक एकवटले असून या उड्डाणपुलासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी प्रयत्न केले मात्र आता त्यांनाच दुर्लक्षित केले जात आहे अशी टीका होत आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते विक्रम राठोड म्हणाले की नगरच्या उड्डाणपुलासाठी अनिल राठोड आणि दिलीप यांनी या दोघांनीही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता मात्र या दोन्ही नेत्यांचा आता स्थानिक नेत्यांना सोयीस्कररित्या विसर पडलेला आहे त्यामुळे आम्ही शिवसैनिकांनी या पुलाचे उद्घाटन करून त्यांच्या कार्याची जाणीव सर्वांना करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उड्डाणपुलावर यावेळी अनिल राठोड आणि दिलीप गांधी यांचे फोटो हातात घेऊन मोठ्या प्रमाणात घोषणा देखील देण्यात आल्या. काँग्रेसने पत्रकार परिषद घेत नगर शहरात आणखी दोन उड्डाणपूल गरजेचे असल्याचे सांगत न्यू आर्टस् कॉलेज ते सक्कर चौक तसेच जाधव पेट्रोल पंप नेप्ती नाका या दरम्यान आणखी दोन उड्डाणपूल करावेत अशी देखील मागणी केली आहे.