अखेर ‘ त्या ‘ उद्योजकाचा मृत्यू , पारनेर तालुक्यात झाला होता गोळीबार

नगर जिल्ह्यातील पुणे रोडवर असलेल्या सुपा एमआयडीसी इथे सरकारी ठेकेदार असलेले इंजिनियर स्वप्निल जयसिंग आग्रे यांच्यावर 27 सप्टेंबर रोजी मांडओहोळ रस्त्यावर गोळीबार करण्यात आला होता. तीन परप्रांतीय हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झालेले आहे. तब्बल 39 दिवस मृत्यूशी ते झुंज देत होते मात्र अखेर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

उपलब्ध माहितीनुसार, शक्ती नारायण राय, नितीश गुड्डू यादव आणि रीसू यादव अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सदर हल्ला हा आर्थिक कारणातून झाला की त्यामागे इतरही काही कारण आहे याचा पारनेर पोलीस सध्या शोध घेत आहेत. हल्लेखोरांनी स्वप्निल यांच्या पोटात दोन गोळ्या तर छातीच्या उजव्या बाजूला एक गोळी तर हातावर एक गोळी झाडली होती.

स्वप्निल हे गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक शासकीय कामे घेत होते. आर्थिक देवाणघेवाणीतून हा हल्ला झालेला आहे का याचा पोलिस शोध घेत असून तीन हल्लेखोरांपैकी दोन जणांना वारणवाडी सबस्टेशन जवळ ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते तर नारायणगाव हद्दीत तिसऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 27 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली होती. सदर घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली मात्र पोलिसांनी विक्रमी वेळेत तीनही हल्लेखोरांना जेरबंद केले होते.