नगर ब्रेकिंग..चिमुरड्याला आईच्या कुशीतून फरफटत घेऊन जात होता बिबट्या

नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात सध्या बिबट्याचा उपद्रव वाढत असून शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात घडलेली असून मोठेबाबा येथे आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्याने फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरडाओरडा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली आणि त्याची त्याच्या तावडीतुन सुटका केली त्यानंतर बिबट्या फरार झाला मात्र या चिमुकल्याची प्रकृती गंभीर आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊसतोड मजूर कोपी करून राहत आहेत. गुरुवारी रात्री ऊसतोड मजूर आपल्या कोपीमध्ये झोपलेले असताना साडेबाराच्या सुमारास बिबट्या तिथे आला आणि आईच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षाच्या बालकाला जबड्यात घेऊन फरफटत जाऊ लागला मात्र चिमुकला ओरडल्याने परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला त्यावेळी त्याने त्याला सोडून देत तिथून पलायन केले. त्याच्या मानेवर मोठ्या जखमा झाल्या असून त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्याला नगरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचा उपद्रव वाढलेला पाहायला मिळत असून वनविभागाच्या कार्यशैलीवर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे . बिबट्याने जेऊर परिसरात याआधी अनेकदा शेळ्या तसेच इतर पशुधनाचे देखील नुकसान केलेले आहे तर माणसावर अनेकदा देखील हल्ले केले आहेत . वनविभागाचे अधिकारी सर्व काही घडून गेल्यावर तिथे येतात आणि वातावरण शांत झाल्यानंतर कुठलीही पावले उचलली जात नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी देखील जावे लागते त्यामुळे देखील शेतकरी बांधव धास्तावलेले असल्याने वनविभागाकडून तात्काळ परिसरातील बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे .