कचरा ओला सुका अन कुठबी फेका , बेशिस्त नगरकरांवर कारवाई कधी ?

नगर शहर अन उपनगरात घंटागाडी रोज सुरू असून परिसरातील नागरिकानी आपला कचरा घंटागाडीतच देण्यात यावा यासाठी महापालिकेकडून रोज गाड्या फिरवण्यात येतात. घंटागाडी परिसरात आल्यानंतर मोठ्या आवाजात घंटागाडीचे गाणे वाजवले जाते आणि अनेक नागरीक आपल्या घरातील साठवलेला कचरा घंटागाडीत टाकतात मात्र शहर आणि उपनगरात अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून येत असून अनेक ठिकाणी पुन्हा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.

नगर महापालिकेला स्वच्छ शहराबद्दल मानांकन देखील मिळाले असून शहरात आणि उपनगरात घंटागाडी रोज कचरा गोळा करण्यासाठी फिरविण्यात येते मात्र अद्यापही काही बेशिस्त नगरकर तसेच व्यावसायिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे दिसून येत असून त्यामुळे शहरात स्वच्छता राखली जात नाही. कचऱ्यातील शिळे अन्न खाऊन भटक्या कुत्र्यांच्या देखील संख्येत वाढ होत असून नागरिकांच्या जीविताला आणि आरोग्याला धोका निर्माण होत आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात महापालिकेने आक्रमकता अवलंबण्याची गरज आहे .

कचरा टाकणाऱ्या व्यक्तींशी प्रत्यक्ष बोलणे केले असता अनेक जणांनी घंटागाडीची वेळ ही आम्हाला सोयीची नाही असे सांगितले असले तरी घंटागाडीची वेळ सोयीची नसेल तर कचरा साठवून एखाद्या दिवशी तरी किमान हा कचरा एकत्रितरित्या घंटागाडीत टाकण्यासाठी नागरिकांनी सुधारण्याची गरज आहे. रस्त्यावर कचरा फेकल्याने शहराच्या अस्वच्छतेत मोठ्या प्रमाणात भर पडत असून भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे यांच्या देखील संख्येत यामुळे वाढ होत आहे. बेशिस्त नगरकरांना आळा घालण्यासाठी महापालिका आता काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.