‘ पदर चाकात अडकलाय ‘, म्हणून महिला थांबली अन .. , नगरमधील घटना

नगर शहरात फसवणुकीचा एक वेगळा प्रकार समोर आलेला असून मोपेडवरून बाजारात चाललेल्या एका महिलेला तुमच्या साडीचा पदर गाडीच्या चाकात अडकला आहे असे सांगण्यात आले त्यानंतर त्या थांबल्या असता त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण एका अनोळखी इसमाने ओरबाडून पळ काढला आहे .नगर बाजार समितीजवळ सहकार सभागृह रोडवर ही घटना घडलेली असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सपना सुनील पटवा ( राहणार सारसनगर) यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली असून बुधवारी पावणेतीनच्या सुमारास त्या त्यांच्या भाचीसोबत सहकार सभागृह रोडने कापड बाजाराकडे निघालेल्या होत्या त्यावेळी हॉटेल पर्वतजवळ त्या आलेल्या असताना शाईन गाडीवर आलेल्या एका इसमाने तुमच्या साडीचा पदर खाली लटकलेला आहे तो चाकात अडकेल असे म्हटले, म्हणून त्या थांबल्या असता पदर नीट करून गाडीवर बसण्याच्या तयारीत त्या होत्या त्याच वेळी त्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याची मिनी गंठण हिसकावले आणि तिथून पळ काढला. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.