‘ आफताब ‘ ला भर चौकात फाशी देण्याची मुस्लिम समाजाची मागणी

श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची अत्यंत अमानुषपणे हत्या करणारा नराधम आफताब पूनावाला याच्या पुतळ्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने कोठला चौकात दहन करण्यात आले. त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी समस्त मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेली असून त्याला भर चौकात फासावर लटकावे असे देखील आंदोलकांचे म्हणणे आहे.

वसई येथे राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीचे आफताब नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते त्यानंतर आरोपीने या तरुणीचा अत्यंत निर्दयपणे खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे देखील केले आणि ते फ्रीजमध्ये लपवले. सदर प्रकरणाने देशात संतापाचे वातावरण असताना नगर शहरातील मुस्लिम समाजाकडून या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे.

मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन शहराचे वातावरण काही समाजकंटक बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांचा देखील पोलिसांनी बंदोबस्त करावा. या एका प्रकरणातून जातीयवादी समाजकंटक समाजात द्वेष पसरवत असून अशा निर्दयी कृत्याचे कुठलाही समाज समर्थन करणार नाही मात्र एका प्रकरणातून समस्त समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. आरोपीला जात-धर्म काहीही नसते त्यामुळे हा खटला जलद गतीने चालवून त्याला भर चौकात फाशी द्यावी, ‘ अशी देखील मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे.