सहकार सभागृहाजवळून पतीचे अपहरण , पोलिसात फिर्याद दिली अन ..

नगर शहरात 21 तारखेला एक खळबळजनक अशी घटना सहकार सभागृह परिसरात घडलेली होती. एका व्यक्तीला परिसरात मारहाण करून कारमध्ये डांबून पळवून नेण्यात आले होते. कोतवाली पोलिसांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण करत आरोपी पुण्यात असल्याची माहिती समजताच वेळ न दवडता कारवाई करत सदर व्यक्तीची सुटका केली आहे. त्यासंदर्भात त्याच्या पत्नी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.

उपलब्ध माहितीनुसार, सचिन आदिनाथ सानप ( राहणार सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड ) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या अपहरणाबाबत त्याच्या पत्नी शीतल सानप यांनी फिर्याद दिली होती. सचिन सानप हे एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत असून सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरी येत असताना त्यांचा फोन अचानक बंद झाला आणि त्या वेळी पत्नी त्यांचा शोध घेत असताना काही जणांनी तुमच्या पतीचे सहकार सभागृह रोडवरून अपहरण करण्यात आले आहे. त्याआधी त्यांना मारहाण केली आणि कारमध्ये बसून पुणे रोडने आरोपी गेलेले आहेत एवढी माहिती पत्नीला समजली.

शितल सानप यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली त्यावेळी कोतवालाचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तात्काळ आरोपींच्या शोधासाठी पुण्याच्या दिशेने पथके रवाना केली आणि अवघ्या काही तासांच्या आत फिर्यादी महिलेच्या पतीची सुटका केली. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.