
नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. शिर्डी येथे मोफत अन्न आणि झोपण्यासाठी जागा उपलब्ध होत असल्याने अनेक कारणांनी त्रासलेले लोक धार्मिक स्थळी धाव घेत असतात. शिर्डी शहरात अशा व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत. नगर येथील एका सेवाभावी संस्थेतून बाहेर पडल्यानंतर शिर्डी येथे आल्यावर एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून शिर्डीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
शिर्डी शहरात राज्यातून तसेच देशभरातून विनातिकीट प्रवास करून या महिला साईबाबांच्या शहरात आपल्याला निदान दोन वेळचे जेवण आणि झोपण्यासाठी जागा मिळेल या आशेने येतात त्यानंतर साईभक्त देखील दान देतात त्यामुळे अशा महिलांचा शिर्डीत सहवास वाढत जातो मात्र दुसरीकडे या महिलांवर व्यसनाधीन असलेल्या तरुणांच्या टोळ्या नजर ठेवून असतात त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन त्यांचे शोषण करण्यात येते. पोलिसांनी अनेकदा कारवाई देखील केलेली आहे मात्र वाढत्या गर्दीच्या प्रमाणात पोलिसांना देखील काम करण्यास मर्यादा येत आहेत. शिर्डी येथील वाढत असलेली गर्दी पाहता पोलिसांना आणखी मनुष्यबळ देण्याची गरज असल्याची मागणी व्यक्त केली जात असून शहरात अशा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे.