उद्योगपतींचे लाख कोटींचे कर्ज माफ मात्र शेतकऱ्याचे एक लाखाचे कर्ज माफ का नाही ?

भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अल्पविराम देत राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये दाखल होत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी राजकोट येथील शास्त्री मैदानावर प्रचार सभेत बेरोजगारी आणि महागाई याच्या विरोधात केंद्र सरकारला जाब विचारलेला असून पंचेचाळीस वर्षांत पहिल्यांदा देशात आणि गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे असेही म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करून देखील रोजगार मिळत नाही. इंजिनिअर डॉक्टर बनायचे होते त्यासाठी खर्च केला मात्र आज गाडी चालवावी लागत आहे. गुजरात हे लघु आणि मध्यम उद्योगांचे केंद्र असून पूर्ण देश तुम्ही चालवता.. तुम्ही खरे तर रोजगार देता पण सरकारने नोटबंदी केली आणि सर्व लघु आणि मध्यम उद्योग बंद झाले. चुकीच्या पद्धतीने जीएसटी कर लागू केला त्यामुळे जे काही वाचले होते ते देखील संपले . तीन ते चार उद्योगपतींचे लाख कोटींचे कर्ज माफ होते मात्र शेतकरी एक लाखाचे कर्ज घेतो तेदेखील माफ का होत नाही ? असे देखील ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, लॉक डाऊनमध्ये देशातील मजूर उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालणे त्या संकटकाळात गुजरात सरकारने मदत केली नाही मात्र त्याच वेळी तुम्ही देशातील श्रीमंत उद्योगपती यांचे कर्ज माफ केले. आम्हाला न्याय करणारा भारत हवा आहे. गुजरातमधून ही यात्रा निघाली नाही याबद्दल मला देखील दुःख आहे मात्र भारत जोडो यात्रा सुरू करण्यामागे महात्मा गांधी आणि गुजरातचा विचार आहे.