मोदींनी आफ्रिकेत करार केलाय..ज्योतिषाची ‘ ती ‘ भविष्यवाणी अन १ कोटी रुपये लंपास : अशी झाली फसवणूक

शेअर करा

बांधकाम व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्याने साताऱ्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने परिसरातील एका मोठ्या पोहचलेल्या ज्योतिषाकडे धाव घेतली. ज्योतिषाला हाथ आणि कुंडली दाखवल्यानंतर ज्योतिषाने चक्क परदेशातील व्यक्ती आपल्या व्यवसायात गुंतवणूक करेल असे शुभ संकेत दिले. आपल्या व्यवसायात चक्क परदेशी भागीदार येणार अशा दिवास्वप्नात तो व्यावसायिक रंगून गेला आणि हे खरही ठरलं मात्र सुमारे सव्वा कोटीचा फटका बसून ते असे ..

उपलब्ध माहितीनुसार, सातारा येथील सचिन घनश्याम वाळवेकर (वय ४२ ) यांचा बांधकाम व्यवसाय आहे. २०१६ साली त्यांचा व्यवसाय अडचणीत आला त्यामुळे ते सातारा येथील एक नामांकित ज्योतिषाकडे आपली कुंडली घेऊन गेले. कुंडली पाहून ज्योतिषाने वाळवेकर यांची सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले तसेच यातून बाहेर येण्यासाठी त्यांना काही रत्ने देखील वापरण्यास दिली तसेच मंत्र जप करण्यास देखील सांगितले.

ज्योतिषाने पुढे हे देखील सांगितले की तुमच्या व्यवसायात आता एका परदेशी भागीदाराचे आगमन होणार आहे आणि त्याच्या पायगुणाने तुम्हाला उद्योगात उत्तुंग असे यश लाभणार आहे . वाळवेकर यांचा यावर विश्वास बसला आणि त्यांनी त्याप्रमाणे मंत्रजप तसेच रत्ने वापरायला देखील सुरु केली. आज ना उद्या आपले दिवस पालटतील अशी एक आशा त्यांना होती.

काही दिवस असेच निघून गेले आणि वाळवेकर यांना प्रिन्स सॉलोमन सिसो नावाच्या व्यक्तीचा फोन आला. साताऱ्यामध्ये आपल्याला बांधकाम क्षेत्रात आपल्याला गुंतवणूक करायची असून त्यासाठी मी सध्या योग्य व्यक्तीच्या शोधात आहे असे त्याने सांगितले. वाळवेकर यांनी माझा नंबर कुठून मिळाला असे विचारले असताना त्याने जस्ट डायल असे उत्तर दिले.

पंतप्रधानांनी भारत आणि आफ्रिका या देशात करार केला असून आम्ही भारतात गुंतवणूक करण्यासाठी आलो आहोत असे प्रिन्स म्हणत होता. वाळवेकर यांना देखील ज्योतिषाने हेच संकेत दिलेले असल्याने त्यांना हा शुभशकुन वाटला आणि त्यांनी झटकन त्याच्यावर विश्वास ठेवला. काही कालावधीत वाळवेकर यांना भेटण्यासाठी दोन व्यक्ती साताऱ्यात आल्या आणि वाळवेकर यांच्याशी करारपत्र देखील केले. सोबतच त्यांनी पेटीत काही युरो देखील आणले होते त्यातील काही युरो चक्क त्यांनी वाळवेकर यांच्या घरी देखील ठेवले त्यामुळे वाळवेकर यांचा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला.

व्यवसायवृद्दीसाठी जमीन व्यवहारात पैसे गुंतवण्यासाठी म्हणून त्यांनी वाळवेकर यांना विविध आमिषे दाखवत टप्प्याटप्प्याने चक्क १ कोटी २७ लाख ४६ हजार रुपये बँकेत भरण्यास सांगितले मात्र त्यानंतर काही काळात त्यांचे फोन बंद झाल्याने वाळवेकर यांना शंका आली आणि आपण फसलो गेल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली .

पोलिसांनी आता या प्रकाराचा तपास सुरु केला असून त्यांनी सांगितलेली नावे भारतीय नाहीत तसेच तब्बल ११ नावे यात आहेत . ह्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगितलेली नावे हीच मुळात खरी आहेत का ? इथपासून ह्या प्रकरणाचा पोलिसांना तपास करावा लागणार आहे . ज्योतिषाने जे सांगितले त्यावर आंधळा विश्वास ठेवल्याचा मोठा फटका ह्या व्यावसायिकाला बसल्याने आता ज्योतिषी आणि त्यांची कर्मकांडे यावर आणखी किती काळ आंधळा विश्वास ठेवायचा याचा विचार करण्याची वेळ आली आहे .


शेअर करा