आयुक्तांच्या आदेशाचे ‘ फुसके बार ‘ , फक्त फोटोसेशन काम शून्य

शेअर करा

नगरचे महापालिका आयुक्त म्हणून डॉक्टर पंकज जावळे यांची नेमणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरात आमूलाग्र बदल होतील अशी आशा नगरकरांना होती मात्र प्रत्यक्षात नगरकरांचे स्वप्न भंग होताना दिसत असून पंकज जावळे यांच्याकडून मात्र रोज नवीन ‘ आदेशाचे ‘ हुकूम काढण्यात येत आहेत मात्र त्यांच्या आदेशाची फक्त न्यूज होण्यापलीकडे पुढे काहीही अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणे काढण्याची मोहीम केवळ जुजबी फोटोसेशनपुरतीच मर्यादित ठरलेली असून शहरात अद्यापही अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स अद्यापही झळकत आहेत. राजकीय दबाव असल्याने आयुक्त पंकज जावळे यांनी कुचकामी भूमिका घेतल्याची टीका नगरकर करत आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडेल अशी देखील नागरिकांना अपेक्षा होती मात्र ते देखील दिवास्वप्न ठरताना दिसत आहे तर रस्त्यांची परिस्थिती बोलण्याच्या पलीकडची आहे .

महापालिका आयुक्त यांचे त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे देखील दुर्लक्ष झालेले दिसून येत असून महापालिकेचे कर्मचारी तब्बल एक ते दोन तास उशिरा येतात त्यांच्यावरही कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. दुपारच्या वेळी जेवण्यासाठी म्हणून गेलेले कर्मचारी आणि अधिकारी एक ते दीड तास उशिरा येतात आणि त्यानंतर काही वेळ थांबून लवकरच घरी निघून जातात याकडे देखील आयुक्तांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत असून प्रत्येक विभागात बायोमेट्रिक हजेरी अन प्रत्येक विभागात सीसीटीव्ही अशा गोष्टींची अंमलबजावणी सहज शक्य आहे मात्र सर्वच कारभार थंडावलेला दिसत आहेत.

शास्ती माफीचे आदेश दिल्यानंतर नगरकरांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून मनपा आयुक्त घरपट्टी पाणीपट्टी वसुली आणि कर्मचार्‍यांना शिस्त लावून वसुली करून घेण्यात अपयशी ठरत आहेत. विविध संघटनांच्या प्रतिनिधींना वेळ देऊन फोटो छापून घेण्याइतपत आयुक्त यांचे काम मर्यादित दिसत असून गोरगरीब नागरिकांशी मात्र आयुक्तांचे वर्तन उद्धटपणाचे असल्याचे अनेक नागरिक खाजगीत बोलून दाखवत आहेत. सामान्य जनता ही देशाची खरी मालक आहे याचा आयुक्त महोदयांना विसर पडलेला असून आपले हात दगडाखाली असल्याने अनेकजण काही बोलण्यास धजावत नाहीत.

महापालिकेची घरपट्टी पाणीपट्टी वसुली व्हावी म्हणून आयुक्तांनी नुकतेच थकबाकीदारांच्या सातबारावर महापालिकेचे नाव लावण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र ही कारवाई देखील निव्वळ ‘ फुसका बार ‘ ठरण्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी मोकळ्या भूखंडावरील नागरिकांचे पत्तेच मिळून येत नाहीत त्यामुळे आयुक्तांनी हे आदेश दिले होते मात्र आयुक्तांचे हे आदेश देखील सोकावलेले कर्मचारी आणि अधिकारीवर्ग यांच्यावर कुणाचा धाक नसल्याने फुसके बार ठरण्याची शक्यता आहे.


शेअर करा