धीरेंद्र कृष्णशास्त्रीचा चक्क रावणासोबत बोलल्याचा दावा, काय झाली चर्चा ?

बागेश्वरधाम येथील महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री हा त्याच्या प्रवचनांमधून अनेक प्रसंग आणि कथा सांगत असतो. त्याने सांगितलेला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेला असून त्याने एका व्हिडिओत चक्क आपण रावणासोबत बोलण्याचा दावा केलेला आहे अर्थात अनेक बाबा आणि बाबा मंडळी त्यांचे वेगवेगळे किस्से सांगत असतात मात्र या महाशयानी चक्क रावणासोबतच बोलण्याचा दावा केल्यानंतर रामायणातील माहित नसलेली माहिती देखील त्यांच्या माध्यमातून समोर येण्याची चिन्हे असल्याच्या खोचक प्रतिक्रिया त्यांना येत आहेत.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज एका ठिकाणी प्रवचन करताना दिसत असून त्यात तो ‘ रावणासोबत आपले बोलणे झाले ‘ असे सांगत आहे. तो म्हणतो की एकदा आमची रावणासोबत फोनवर बातचीत झाली आता नंबर काय होता हे विचारू नका. आम्ही त्यांना विचारलं दशाननजी माय डियर कसे आहात तेव्हा ते म्हणाले हॅलो बागेश्वरवाले बोलत आहात का? आम्ही हो म्हणालो.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणतो की, ‘ आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कसे आहात ? आम्ही बुंदेली इथे एकमेकांशी बातचीत केली. रावण म्हणाला ठीक आहे भाऊ जेव्हा आवाज कर्कश यायला लागला तेव्हा आम्ही रावणाला विचारले की तुम्ही दहा तोंडाने बोलत आहात का? नऊ तोंडे लॉक करा आणि एका तोंडाने आमच्याशी बोला .’

नागपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान स्वीकारण्याऐवजी धीरेंद्र कृष्ण शास्त्री या महाराजांनी तेथून पळ काढला आणि इतरत्र जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तुम्हाला चमत्कार दाखवू मात्र तुम्ही इकडे या असे म्हटलेले होते. दिव्यशक्ती जर सगळीकडेच आहे तर या महाराजांची दैवी शक्ती केवळ ठराविक ठिकाणीच का चालते ? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात असून बहुतांश बाबांची अशीच परिस्थिती आहे. देशातील साधी भोळी जनता त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असल्याने त्यांचे असे फावते आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यास दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी आणि समितीकडून त्यांना तीस लाख रुपये देण्यात येतील असे देखील म्हटलेले होते तसेच त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध केली तर आपले वय 71 वर्ष असून देखील आपण अवघे 26 वय असलेल्या या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाया पडू असे सांगत तीस लाख रक्कम ही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासाठी जरी कमी असेल तरी कमीत कमी त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्यासाठी म्हणून तरी हे आव्हान स्वीकारावे असे श्याम मानव यांनी म्हटलेले होते मात्र त्याआधीच धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूर इथून पळ काढला आणि त्यानंतर श्याम मानव यांचे आवाहन आव्हान आपण स्वीकारले असून दुसऱ्या राज्यात जाऊन ‘ तुम्हाला जर दिव्यशक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही रायपूर येथे या पण नागपूरला दिव्यशक्तीसाठी आम्हाला बोलावू नका , ‘ असेही म्हटलेले आहे.

श्याम मानव यांनी त्याला नागपूर येथे एका बंद हॉलमध्ये आम्ही तुमचे प्रवचन आयोजित करू आणि तुम्ही दुसऱ्या भिंतीआड असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून द्यावी. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सोडून देऊ असे आव्हान दिलेले होते त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन तुम्ही इथे या. तुमच्या येण्या-जाण्याचा खर्च आम्ही करू असे सांगितले होते. धीरेंद्र शास्त्री बाबा याची दिव्यशक्ती ही ठराविक विभागातच काम करते का ? अशी देखील चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त हिंदू धर्माच्या विरोधात काम करते आहे असे आरोप नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आलेले असून अंधश्रद्धेचा सर्वाधिक मोठा पगडा हा हिंदू समाजावरच आहे याचे आरोप करणाऱ्यांना भान राहिलेले दिसून येत नाही.