महाराष्ट्र पोलिसांच्या मॉकड्रीलमुळे धार्मिक भावना दुखावल्या , नक्की काय झालंय ?

दहशतवादाला कुठला धर्म नसतो असे म्हणत जरी असले तरी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या एका मॉकड्रिल कारवाई प्रकाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चंद्रपूर येथील ही घटना असून चंद्रपूर पोलिसांनी आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली परिसरात एक मॉकड्रिल ऑपरेशन केलेले होते या ऑपरेशनमध्ये पोलीस कारवाईची रिहर्सल म्हणून केलेल्या प्रकारात अतिरेकी हल्ला असल्याचे दाखवण्यात आले आणि सहभागी असलेल्या आणि नकली दहशतवादी बनलेल्या काही जणांनी अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. पोलिसांच्या या ऑपरेशनमध्ये जाणीवपूर्वक अशा घोषणा दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्याकडे स्थानिक वकिलांनी तक्रार केलेली आहे. अशा प्रकारातून मुस्लिम बांधवांबद्दल समाजात चुकीचा संदेश जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

11 जानेवारी रोजी दहशतवादी हल्ल्याचे ऑपरेशन करण्यात आलेले होते त्यामध्ये जे पोलीस नकली दहशतवादी बनलेले होते त्यांनी अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या आणि सामील झालेले अतिरेकी हे एका विशिष्ट धर्माचेच आहेत असे जाणीवपूर्वक दाखवण्यात आले. पोलिसांचे हे कृत्य आमच्या समाजाला बदनाम करणारे आहे. इस्लाम हा दहशतवादी धर्म असल्याचा गैरप्रसार देखील यामुळे होतो असे सांगत पोलिसांनी जर अशी भूमिका घेतली तर समाजात द्वेषाची भावना वाढीला लागेल आणि सामाजिक वातावरण दूषित होईल असे देखील सांगत यातील संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी अशी चंद्रपूर येथील पाच वकिलांनी तक्रार केलेली आहे.

चंद्रपुरातील आराध्य दैवत असलेली माता महाकाली परिसरात 11 जानेवारी रोजी पोलिसांच्या रिहर्सलचा भाग म्हणून हे ऑपरेशन करण्यात आले होते. मंदिरात बॉम्ब आहे त्यानंतर पोलीस कशा पद्धतीने रिऍक्ट करतील यासाठी हे ऑपरेशन रचण्यात आले मात्र त्यात देण्यात आलेल्या घोषणांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. यापुढील काळात असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांनी आमची दखल घ्यावी म्हणून आम्ही हे निवेदन देत आहोत असे सांगत पोलीस अधीक्षक यांच्याकडे हे निवेदन देण्यात आलेले आहे.