… तेवढा ‘ एक ‘ मोह टाळला असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

सासू आणि सासऱ्यासोबत भांडण करून तिने घर तर सोडले मात्र तिला जिथे जायचे होते तिथे ती पोहचू शकली नाही. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर येथे पायी येणाऱ्या एका महिलेसह तिच्या मुलाला एकाने दुचाकीवर बसवले. काहीतरी बहाना करून त्या महिलेला कढरे गावालगतच्या जंगलात नेऊन तिचा साडीने गळा आवळून खून केला तर मुलाला देखील मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. संगीताबाई सुखदेव होलार असे मयत महिलेचे नाव असून सदर प्रकरणाचा तपास सुरु आहे .

धुळे तालुक्यातील नंदाने येथे सुखदेव होलार हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात.18 सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी संगीताबाई हिचा सासू -सासर्‍यांचे सोबत कौटुंबिक वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या संगीताबाई तेरा वर्षाचा मुलगा रवी यांना सोबत घेऊन साक्री तालुक्यातील नवागाव येथे आपल्या मुलीकडे पायी निघाल्या.

नंदानेपासून लामकानीपर्यंत आल्यानंतर त्यांनी एका ओळखीच्या घरी जेवण घेतले आणि पुन्हा त्या नवागावच्या दिशेने मुलासोबत पायी निघाल्या. त्याच वेळेस एक जण दुचाकी घेऊन त्यांच्याजवळ आला आणि मदत करण्याचा बहाणा करून त्याने या दोघांना गाडीवर बसवले. ‘ बैलगाडीत खतगोणी टाकून देऊ ‘ अशी बतावणी करत त्याने डाव्या हाताला रस्त्याने दुचाकी आत जंगलात नेली. जर संगीताबाई यांनी तो लिफ्टचा मोह टाळला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता .

जंगलात दुचाकी थांबून तो माणूस संगीताबाईला कुठेतरी घेऊन गेला. त्या ठिकाणी संगीताबाईचा साडीने गळा आवळून खून केल्यानंतर तो दुचाकी जवळ आला. मुलाने आईची विचारणा केल्यानंतर मुलाचा सुद्धा शर्टाने गळा आवरण्याचा त्याने प्रयत्न केला. यात मुलगा रवी बेशुद्ध पडल्याने आरोपीने तेथून पळ काढला. ही घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

जंगलात बकऱ्या चारणाऱ्यांनी बेशुद्ध रवीला शुद्धीवर आणले तेव्हा त्याने हा घडलेला सर्व किस्सा त्यांना सांगितला. त्यानंतर जंगलात शोध घेतल्यानंतर संगीताबाईचा मृतदेह शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आढळून आला. याप्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


शेअर करा