तपासणी करताना तिने ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवले सुरु..’ बॅड टच ‘ वाला डॉक्टर धरला : कुठे घडला प्रकार ?

  • by

डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एका डॉक्टरवर करण्यात आला असून सदर डॉक्टरला अटक करण्यात आली आहे . टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, संबंधित मुलगी 19 सप्टेंबरला पहाटे 5 वाजता मुलीला ताप आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे वडिलांसोबत ती साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तपासणीसाठी गेली. डॉक्टरने वडिलांना बाहेर थांबवत मुलीला अपघात विभागात नेले. तपासणी करत असताना आरोपी डॉक्टरने मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा या डॉक्टरवर आरोप आहे.

डॉक्टरकडून असा अनुभव आल्यानंतर मुलीने वडिलांना बोलवत ‘इथे उपचार नको’ असे सांगितले. पण तपासणी करताना अनावधानाने हात लागला असेल म्हणून वडिलांनी मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले मात्र दुसऱ्यांदा जेव्हा मुलगी तपासनीस गेली तेव्हा तिने हातातील मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु ठेवले होते . रेकॉर्ड झालेला ऑडिओ ऐकल्यानंतर मुलीच्या वडिलांची खात्री पटली आणि त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत कलम 8 आणि 10 नुसार तसेच भा.द.वि कलम 354 ( अ ),( ब ) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पीडित मुलीला कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने मुलगी तपासणीसाठी गेल्यानंतर हा प्रकार घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. एकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे तर दुसरीकडे तपासणी करण्यास गेले असता असे गंभीर प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.